बोरिस येथे सतीमाता मंदिराचा यात्रोस्तव उत्साहात सुरु……..
कापडणे प्रतिनिधी – धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध बोरिस यात्रेला शुक्रवार पासून सुरुवात होत असून तब्बल पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी व्यावसायिक व पाळणे दाखल झाले आहेत. यात्रोत्सवाची संपूर्ण तयारी सतीदेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामपंचायतिच्या वतीने व्यावसायिकांना जागा देण्यासह विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छतेची काळजी घेतली जात असल्याचे गटनेते परशुराम देवरे यांनी सांगितले.
धुळे तालुक्यात असणाऱ्या बोरिस गावाची यात्रा ग्रामीण भागातील प्रसिद्ध यात्रा असते. या यात्रेला दीडशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. या यात्रोत्सवाला खान्देशातील भाविकांसह मध्यप्रदेश, गुजरात व पुणे, मुंबई, नाशिक येथून भाविक येत असतात. गावालगत असलेल्या या सतीदेवी मंदिर सुरुवातील १८३२ साली लाकडी बांधणीने करण्यात आली होती. पुढे १९८६ साली या मंदिराचा जिर्णोदार शिवाजी रायमल देवरे यांच्या हस्ते झाला. मंदिर ट्रस्टची स्थापना १९५६ साली करण्यात आली होती.
या यात्रोत्सवात विविध प्रकारची अत्याधुनिक पाळणे दाखल झाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने थाटली गेली आहेत. या यात्रेत वर्षभर लागणारी साधने खरेदी केली जातात. यात तिखट, मसाला, दैनंदिन जेवणासाठी लागणारी अनेक प्रकारची मसाले, सौंदर्यप्रसाधने व विविध प्रकारची खेळणी विक्रीला आलेली आहेत या यात्रेत अनेक पर राज्यातील व्यापारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या यात्रेत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांना उत्पन्न मिळत असते. या यात्रोत्सवात धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर आगाराच्या वतीने देखील जादा बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
या यात्रोत्सवात शेतीसाठी लागणारी अवजारे मोठ्या प्रमाणावर विक्रीला येतात. यात लोखंडी व लाकडी बैलगाड्यांचे मोठे वैशिष्ट्य असते. या यात्रेत शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर साधन सामुग्री खरेदी करतात. लाकडी बैलगाडी खरेदी करण्यासाठी दुरून शेतकरी येत असतात.
*प्रतिक्रिया*
यात्रेत गावातील तीन तगतराव व परिसरातील गावांमधील तगतराव देखील यात्रेच्या दिवशी मंदिराला प्रदक्षिणा घालतात. यात्रेच्या दिवशी पिठलं (बेसन) भाकरीचा प्रसाद दिला जातो. यात्रेत मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्यासाठी भाविक येतात. गावातील तरुणांच्या वतीने वाहनांची पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.
*(नरेंद्र राजेंद्र देवरे, ग्रामस्थ)*
*पोलिसांची राहणार करडी नजर*
या यात्रोत्सवात सुरुवातीला आठ दिवस मोठी गर्दी उसळते. या यात्रोत्सवात अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून सोनगीर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पंचवीस पेक्षा जास्त अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्त राखणार आहेत. पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व चोऱ्या करणाऱ्या टोळीवर विशेष लक्ष असणार आहे. विद्युत पुरवठा सुरळीत रहावा व गावातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित रहावे म्हणून पत्र व्यवहारही करण्यात आल्याची माहिती सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी दिली.