जळगाव जनता बॅंकेतर्फे एरंडोलला बचत गट महिलांचा मेळावा.
महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे.-डॉ.आरतीताई हुजूरबाजार.
एरंडोल-महिलांनी बचत गटांची स्थापना करून विविध उद्योग व व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.आरतीताई हुजूरबाजार यांनी केले.तालुक्यातील बँकेशी संलग्नित असलेल्या बचत गटांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील अध्यक्षस्थानी होत्या.बँकेच्या संचालिका नीता देशमुख,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालिका श्रीमती दर्शना तिवारी,माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन प्रमुख पाहुण्या होत्या.बँकेच्यावतीने उपस्थित महिलांना हळदी कुंकू व संक्रांतीचे वाण देण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या प्रांगणात जनता बँकेशी संलग्नित असलेल्या तालुक्यातील पन्नास बचत गटाच्या महिलांचा मेळावा बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.बँकेच्या संचालिका डॉ.आरतीताई हुजूरबाजार,नीता देशमुख,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,आरती महाजन,दर्शना तिवारी यांच्याहस्ते द्वीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.यावेळी डॉ.आरतीताई हुजूरबाजार यांनी महिलांनी एकत्र येवून बचत गटांची स्थापना करून समाजाभिमुख उपक्रम राबवावे असे आवाहन केले.महिलांच्या विकासात बचत गटांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले.महिलांनी काम करत असतांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.बचत गटांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.संचालिका नीता देशमुख यांनी बँक बचत गटाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.बँकेच्या बचत गटाच्या विभागप्रमुख वैशाली महाजन यांनी जिल्ह्यात बँकेशी संलग्नित ३ हजार ५०० बचत गट असून तालुक्यात पन्नास बचत गट असल्याची माहिती दिली.तालुक्यातील बचत गटांना सुमारे एक कोटी रुपयांचे कारज दिले आहे.बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे सांगितले.जनता बँकेच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी बचत गट म्हणजे महिलांच्या विकासासाठी मिळालेली मोठी संधी असल्याचे सांगितले.बचत गट महिला मेळाव्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी संध्या महाजन यांचेसह अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले.बँकेच्या अधिकारी वैशाली महाजन यांनी प्रास्ताविक केले.मनीषा आवारे यांनी सुत्रसंचलन केले.बँकेच्या बचतगट सहयोगिनी स्वाती वैद्य यांनी आभार मानले.यावेळी उपस्थित महिलांनी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.जनता बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना चांगली सेवा देत असल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या,यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण देण्यात आले.मेळाव्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक विलास मते यांचे मार्गदर्शनाखाली गौरव देशमुख,नितीन महाजन,कुंदन सोळंकी,बचत गट सहयोगिनी स्वाती वैद्य यांनी सहकार्य केले.