प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी
बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक….
जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) :- प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणी करणे बंधनकारक आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आधारशी संलग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार आहे. जळगाव जिल्ह्यात अद्यापही अमळनेर तालुका-2880, भडगाव-1968, भुसावळ-1277, बोदवड-1394, चाळीसगाव-3535, चोपडा-2722, धरणगाव-2232, एरंडोल-2153, जळगाव-2262, जामनेर-3287, मुक्ताईनगर-2154, पाचोरा-2503, पारोळा-2390, रावेर-2719, यावल-3018 असे एकूण 36 हजार 494 लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडलेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्याच्या बँक खात्यात तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.
तरी अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी संलग्न केलेले नसेल अशा प्रलंबित लाभार्थ्याचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत (IPPB) खाती उघडण्याची व ते खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही शासनाकडील सुचनांनुसार पोस्ट खात्याकडून करण्यात येत आहे. ज्या पीएम किसान लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणी केलेले नाही, अशा प्रलंबित लाभार्थ्याच्या गांवनिहाय याद्या त्या गावच्या संबंधित पोस्टमन, पोस्टमास्तर यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. यादीतील लाभार्थ्यांना गावातील पोस्टमास्तर, पोस्टमन संपर्क करुन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत त्यांचे खाते सुरु करुन खाते आधार क्रमांकास जोडणी करुन देतील. ही मोहीम 1 ते 7 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. तरी ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडणी करणे बाकी असेल, अशा प्रलंबित लाभार्थ्यांनी गावचे पोस्टमन/पोस्टमास्तर यांचेशी संपर्क साधून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते सुरु करुन हे खाते आधार क्रमांकास जोडणी करुन घ्यावे. असे आवाहनही नोडल अधिकारी पीएम किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.