चाळीसगांव येथील निवासीशाळेचा संघ
विभागीय स्पर्धेसाठी येथे रवाना….
प्रतिनिधी जळगाव :- समाज कल्याण विभागाच्या चाळीसगाव येथील अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेचा 54 मुलांचा संघ विविध क्रिडा प्रकारातील विभागीय स्पर्धेसाठी आज राहुरी येथे रवाना झाला. राज्यात मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा तसेच सफाई कामगारांच्या मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा सुरू आहेत. या निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विभागातंर्गत नवनविन शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे.
त्याअंतर्गत समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन विभागाच्यावतीने प्रथमच करण्यात आले आहे. त्याअतंर्गत नाशिक विभागातील शासकीय निवासी शाळांच्या विभागीयस्तरीय कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात 8 फेब्रुवारी, 2023 रोजी करण्यात आले आहे.
या विभागस्तरीय कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9:30 वाजता समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण नाशिक विभाग बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव योगेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. या कला व क्रीडा महोत्सव कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यासाठी अभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे तसेच 100 मी., 200 मी., 400 मी. धावणे, रीले-4×100 मी.. लांब उडी, थाळीफेक. रस्सीखेच व खो-खो या क्रीडाप्रकारातील स्पर्धा होणार आहेत. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व निवासी शाळांमधील जिल्हास्तरावर पात्र ठरेलेले विद्यार्थी सहभागी होणार आहे.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन विभागात प्रथमच कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, यामुळे खाजगी शाळांप्रमाणेच समाज कल्याण विभागातील विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळणार असून या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांकडून स्वागत होत आहे. या उपक्रमामुळे मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय निवासीशाळांमधून चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण होणार आहेत. या संकल्पनेमुळे अनुसूचित जातीच्या व मागासवर्गीय मुला-मुलींना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.