थोर पुरुषाची प्रतिमा या तरुणांनी वेळीच झाकून दिल्याने अनर्थ टळला.
अमळनेर : तहसील कार्यालयाच्या बाहेर असलेल्या थोर पुरुषाची काळी पडलेली प्रतिमा तीन तरुणांनी समयसूचकता व संवेदनशीलता जाणून वेळीच झाकून दिल्याने अनर्थ टळला. तरुणाईने दाखवलेल्या संयम आणि सहकार्याचे कौतुक होत आहे.
सर्वसाधारण पणे थोर व्यक्तींच्या प्रतिमेला डाग लागला तरी कुणावर तरी संशय निर्माण होऊन तणाव निर्माण करण्यात तरुण आघाडीवर असतात. असाच प्रसंग काही दिवसांपूर्वी अमळनेरात घडला होता. मात्र त्याची पुनरावृत्ती होता होता वाचली. दोन तीन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाबाहेर असलेल्या जिजाऊ प्रवेशद्वारावर जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि उन्हामुळे त्या प्रतिमांवरील रंगांची रासायनिक अभिक्रिया होऊन छत्रपतींच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले. डाग असे होते की कोणीतरी हेतुपुरस्कर काळे लावले आहे. ही बाब काही लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रशासन व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणली देखील परंतु ‘शिवाजी घराघरात जन्माला यावेत पण शेजारच्या घरात ‘ या उपरोधिक वाक्यप्रमाणे खर्च कोण करेल म्हणून ती प्रतिमा तशीच होती. काही व्यक्तींच्या लक्षात आल्यावर सोशल मीडियावर संदेश पसरू लागले व वातावरण गंभीर होत होते. उगीच गैरसमज होऊन जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये आणि थोर पुरुषांची विटंबना अथवा विद्रुपीकरण होऊ नये ,कायदा सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून जालिंदर चौधरी ,राहुल कंजर ,श्याम शिर्के या तरुणांनी नवा कापड आणून शिवरायांची प्रतिमा झाकून टाकली आणि ताबडतोब ती बदलवण्याची तयारी दर्शवली. तेव्हढ्यात मग समाज सेवक जागृत झाले आणि खराब झालेल्या प्रतिमा काढून घेण्यात आल्यात. त्या जागी नव्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत.त्या तिन्ही तरुणांच्या समजदारपणा आणि समयसुचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.