राज्यात ‘थायरॉईड जनजागृती व उपचार अभियाना’चा शुभारंभ
प्रतिनिधी मुंबई : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन आज करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, आमदार सुरेश भोळे, जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. राज्यात अाजपासून “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार आहे.
मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व बऱ्याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.