वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रमानिमित्त सोमवार, १ मे, २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात जास्तीत जास्त नागरीकांना सहभागी होता यावे, यासाठी १ मे २०२३ रोजी सकाळी ७.१५ ते ९.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ९.०० वाजेच्या नंतर आयोजित करावा. असेही रवींद्र भारदे, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.