एरंडोल महसूल मंडळात अतिवृष्टीचा फटका.
एरंडोल:-तालुक्यातील एरंडोल महसूल मंडळात शनिवारी रात्री एक वाजेपासून रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला . या मंडळात अवघ्या पाच तासात ७७ मिलिमीटर अर्थात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या अतिवृष्टीचा शेतातील कपाशी सह इतर खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पिंपळकोठा बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, प्रिंपी बुद्रुक, प्रिंपी प्र.चा. या चार गावांमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील काही घरे पुरात वाहून गेली तर काही घरांचे पुरामुळे नुकसान झाले प्रिंपी प्र.चा येथे पुरात एक बैल वाहून गेला. माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन हे पिंपळकोठा व प्रिंपी बुद्रुक येथे भल्या पहाटेपासून दाखल झाले व त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्त नागरिकांशी संवाद केला. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी सकाळी तत्पर तेने पिंपळकोठा व प्रिंपी बुद्रुक येथे जाऊन त्यांनी पूर परिस्थितीची पहाणी केली.नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी लवकरच सुरुवात होणार असल्याचे महसूल यंत्राच्या सूत्राने सांगितले.
पिंपळकोठा प्रिंपी परिसरात जवळपास ५० ते ६० घरांचे नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाले. काही घरांमधील संसार उपयोगी वस्तूंसह इतर सामान पुरात वाहून गेला तर काही घरांचे पुरामुळे नुकसान झाले. दरम्यान गटविकास अधिकारी दादाभाऊ जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणी केली.
तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्यासोबत नायब तहसीलदार किशोर माळी उदय निंबाळकर विलास धाडसे बालाजी लोढे, सलमान तडवी अतुल तागडे सरपंच कोतवाल पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते. विशेषतः नदीकाठावरील घरांना पुराचा मोठा फटका बसला तालुक्यात इतर ठिकाणी सुद्धा घरांची अंशतः पडझड झाली शेती पिकांचे शेतात पाणी साचल्यामुळे मोठे नुकसान झाले .
तालुक्यात रात्रभर मेघर्जनेसह पावसाचे तांडव सुरू होते. अवघ्या चार पाच तासात चौकार व षटकारांचा वर्षाव करून यंदाच्या पावसाळ्यातील अनुशेष भरून काढून पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यामुळे अंजनी नदीला व तालुक्यातील नाल्यांना पूर आले आहे. या पावसामुळे विहिरींची पाणी पातळी सुद्धा कमालीची वाढली आहे.