एरंडोल येथे १८ सार्वजनिक मंडळांतर्फे लाडक्या बाप्पाला निरोप..
एरंडोल:-गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत येथील दहा दिवसांच्या गणेश उत्सवातील सहभागी झालेल्या १८ सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे अनंत चतुर्दशी च्या दिवशी उत्साहात कासोदा दरवाजा कडील अंजनी नदी पात्रात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या दिवशी सकाळपासून दिवसभर बाप्पाच्या नावाने एक चक्र नगरी दुमदुमली.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला मिरवणुकीचा अग्रभागी जय गुरु व्यायाम शाळेचा मानाचा गणपती होता. नागोबा मढी मोठा माळीवाडा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भगवा चौक, भोई गल्ली या मार्गाने मिरवणूक जाऊन कासोदा दरवाजा कडील अंजनी नदी काठावर मिरवणुकीची सांगता झाली.
माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन व मित्र परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच मान्यवर यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगरपालिकेतर्फे सर्व गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. पीर बाखरुम बाबा दर्ग्या जवळ मुस्लिम पंच कमिटी तर्फे डॉक्टर भुसनळे यांच्या निवासस्थानाच्या दुसऱ्या मजल्यावरून गणेश मुर्त्यांवर पुष्प वृष्टी करण्यात आली. श्रीराम गणेश मंडळाच्या महिला व मुलींचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण ,नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यकपोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक यांनी चोख बंदोबस्त ठेवला.