शरद महाजन यांना आर्ट बिट्स फाऊंडेशनचा ‘ गुरू गौरव पुरस्कार ‘
प्रतिनिधी – एरंडोल येथील सुप्रसिध्द व्यंगचित्रकार, सुलेखनकार व चित्रकार शरद महाजन यांना सन २०२३-२४ चा कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ‘ गुरू गौरव पुरस्कार २०२३ ‘ प्रदान करण्यात आला.
आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणे या संस्थेने अनेक धडपडणाऱ्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे बहुमोल कार्य केले आहे.संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये चित्रकला, शिल्पकला, संगीत, गायन, नृत्य,अभिनय, ग्रामीण भागातील कलावंत,अशा अनेक कलाक्षेत्रातील नामवंत तसेच नवतरुण कलावंतांना प्रकाश झोतात आणण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी सुरू केलेली ही संस्था नवतरुण कलावंतांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.संस्था कलावंतांना जगासमोर आणण्यासाठी एक मासिक वृत्त देखील प्रकाशित करीत आहे.ज्यामध्ये जगभरातील नामवंत कलावंतांना आमंत्रित करून मार्गदर्शक मुलाखती व तसेच नवतरुण कलावंतांच्या कलाकृती प्रकाशित केल्या जातात.
शरद महाजन यांना नुकताच नोव्हेंबर २०२३ मध्ये जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा ‘ आदर्श शिक्षक हा ‘ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ ‘ मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
शरद महाजन यांना यापूर्वी देखील त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थेतर्फे अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सुध्दा त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून कोविड काळात समाज प्रबोधन केले आहे.त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघटना, पुणे – पालघर यांनी ‘ कोविड योध्दा ‘ गौरव पुरस्कार प्रदान केला आहे.संपुर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट व्यंगचित्रकार व सुलेखनकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने काही सेवानिवृत्त शिक्षकांना सोबत घेऊन गरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘ सहकार्य सेवा संस्था ‘ स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, विनामूल्य पुस्तक पेढी, वंचित मुलांसाठी वीटभट्टी शाळा, व्यवसाय मार्गदर्शन, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वारली पेंटिंग व हस्तकला प्रशिक्षण, स्पर्धा व शिबीरे व गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले.
शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना दर रविवारी गणित व विज्ञान विषय मार्गदर्शन,तसेच शाळेतील इ.८ वी व ९ वी च्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इच वन टीच वन फाऊंडेशन,सायन, मुंबई या संस्थेचा पालघर जिल्हा समन्वयक म्हणून दरवर्षी मोफत वह्या, पुस्तके, गणवेश वाटप आणि दररोज विनामूल्य गणित इंग्रजी विज्ञान विषयाच्या मार्गदर्शनाची सोय केली.शाळेला आवश्यक साहित्याच्या माध्यमातून मदत निधी मिळवून दिला.
लहानपणापासून गणित विषयाची आवड असल्याने ‘ गणित विषयातील अप्रगत विद्यार्थ्यांच्या समस्या व उपाय ‘ या विषयावर जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे तर्फे संशोधनासाठी सन २००९ मध्ये ‘ विद्याव्रती पाठ्यवृत्ती मिळाली.त्या अंतर्गत ‘ गणित आता सोपं झालं ‘ व ‘ पाया गणिताचा ‘ या गणित संकल्पनावर आधारित पुरक पुस्तकांची निर्मिती केली.
सन २०१० ते २०१४ पर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे गणित अभ्यास मंडळ सदस्य म्हणून कार्य केले.अनेक वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ( भारत सरकारचा उपक्रम) अंतर्गत बालवैज्ञानिक घडवण्यासाठी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून कार्य केले.
शरद महाजन हे सध्या दै.महाराष्ट्र सारथी वृत्तपत्रासाठी व्यंगचित्रकार व वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.तसेच मार्मिक साप्ताहिकसाठी व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत , आवाज, महाराष्ट्राची जत्रा, धमाल धमाका व अनेक दिवाळी अंकासाठी व्यंगचित्र रेखाटन करीत आहेत.जीवनसत्य व सुवर्णयुग हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून एक अ ल क लघुकथा संग्रह व हास्य व्यंगचित्र संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणे यांचा कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘ गुरू गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री.शरद महाजन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.