एरंडोल मध्ये सातवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..
सत्यशोधक हिरालाल व प्रल्हाद पितांबर महाजन यांचा क्रांतिकारी निर्णय !..
सत्यशोधक विवाह लावणे ही काळाची गरज – पी.डी.पाटील
प्रतिनिधी – एरंडोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल पितांबर महाजन यांचे सुपुत्र व सत्यशोधक प्रल्हाद पितांबर महाजन यांचे पुतणे सत्यशोधक भूषण व जामनेर येथील रहिवासी राजू दगडू चौके यांची जेष्ठ कन्या सत्यशोधिका रोशनी यांच्या सत्यशोधक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सत्यशोधक विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरण, क्रिडा, साहित्यीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खंडेरायाची तळी भरून सत्यशोधक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना सामूहिक रीतीने घेण्यात आली. सत्यशोधक विवाह स्थळी क्रांतीची मशाल वधू-वरांच्या शुभहस्ते पेटविण्यात आली यानंतर वर माता-पिता व वधू माता – पिता यांच्या शुभहस्ते महात्मा बळीराजा, संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत गाडगेबाबा या महापुरुषांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले लिखित मंगलाष्टक झाल्यानंतर वधू-वरांनी सामूहिक सार्वजनिक सत्यधर्म प्रतिज्ञेची शपथ घेतली. यामध्ये एरंडोल शहरात पहिला सत्यशोधक विवाह २०१६ ला मनोज छगन महाजन ,
दुसरा २०१९ ला दिनेश गणेश महाजन, तिसरा २०२० ला प्रसाद बुधा महाजन, चौथा प्रल्हाद पितांबर महाजन,पाचवा २०२३ ला दशरथ बुधा महाजन, सहावा २०२४ अनिल केशव महाजन, सातवा २०२४ हिरालाल पितांबर महाजन या परीवारामध्ये सत्यशोधक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
माजी तहसिलदार अरुण माळी, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांच्या हस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन ( एरंडोल ) यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने सर्व विधी करण्यात आले. या सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रबोधन पी डी पाटील व आभार प्रल्हाद महाजन यांनी मानले.