चोरट्यांनी चार ठिकाणी केली घरफोडी ..
प्रतिनिधी अमळनेर : घरमालक गावाला गेल्याची संधी शोधत चोरट्यानी तालुक्यात चार ठिकाणी घरफोडी करून सुमारे सव्वा सात लाख रुपयांचे दागिने ,मोटरसायकल लॅपटॉप व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशिक्षणासाठी रजेवर गेले आहेत. त्यांचा पदभार पारोळा येथील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आला होता. मात्र ते ही सुटीवर गेल्याने चोरट्यानी हात साफ करण्याची संधी साधली आहे. दोन दिवसांपूर्वी चार दुकाने फोडण्यात आली होती. त्यांनतर धुपी ,मुंदडा नगर व विद्यानगर भागात चोरट्यानी चार घरे फोडली आहेत.
तालुक्यातील धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी शेतातली कपाशी ,दादर आणि हरभरा विकून आलेले तसेच पशुखाद्य व्यवसायातील पाच लाख रुपये आठवडाभरापूर्वी लोखंडी कपाटात ठेवून ७ रोजी नाशिक येथे निघून गेले होते. ११ रोजी सायंकाळी ६ वाजता भागवत जाधव यांनी फोन करून कळवले की घराचा मागील दरवाजा उघडा आहे. म्हणून सुभाष जाधव हे १२ रोजी सकाळी १० वाजता आले असता घराच्या दरवाज्याच्या कडी कोंडा कुलूप तोडलेले आढळून आले. घरातील सामान अस्तव्यस्त पडलेला होता. कपाटातील पाच लाख रुपये काढून नेण्यात आले होते.सुभाष जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यांसाहेब देशमुख करीत आहेत.
तर मुंदडा नगर मधील रहिवाशी नरेंद्र प्रकाश सूर्यवंशी हे सेवनिवृत्तीची रक्कम व शेती मालाची रक्कम घरातील कपाटात ठेवून ११ रोजी सायंकाळी ६ वाजता मूळ गावी खवशी येथे गेले होते. १२ रोजी सकाळी १० वाजता शेजारी प्रवीण शालिग्राम पाटील यांनी फोन केला की तुमच्या घराचा कडी कोंडा तोडलेले आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे.नरेंद्र सूर्यवंशी यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील कपाटातील ५० हजार रुपये आणि ३ हजार रुपयांचा चांदीचा गणपती , ४ हजार २०० रुपयांची चांदीची देवीची मूर्ती , ४ हजार ८०० रुपयांच्या चांदीच्या साखळ्या , १८०० रुपयांचे जोडवे , ५ हजार ४०० रुपयांचे लहान मुलांचे चांदीचे कडे असा एकूण ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार
त्याचप्रमाणे संत सखाराम महाराज नगर मधील हुकूमचंद शांताराम पाटील यांची मुलगी आजारी असल्याने ११ रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले होते. १२ रोजी सकाळी साडे सात वाजेला त्यांची पत्नी घरी आली असता घरचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील ३० हजार रुपये रोख , २० हजार रुपयांचा लॅपटॉप , ४ हजार रुपयांचा मोबाईल , ५० हजार रुपयांची गळ्यातील सोन्याची चेन , २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या , ६ हजार रुपयांच्या चांदीच्या मुर्त्या , पासबुक ,एटीएम कार्ड , कार्यालयीन कागदपत्रे तसेच तेथील रहिवासी विजय वाडेकर यांची बाहेर लावलेली २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एन ००८२ असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याचप्रमाणे आंनदा बाबुराव सोनवणे यांच्याही घराचा कडी कोंडा तोडलेले आढळून आला.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख ,पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे,संजय बोरसे ,सिद्धांत शिसोदे यांनी भेटी देऊन पंचनामे केले. जळगावहून श्वान पथक , ठसे तज्ञ पोलीस उपनिरीक्षक सचिन डोंगरे यांना पाचारण करण्यात आले होते. शहरात रोज होणाऱ्या घरफोडींमुळे नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे.
सर्व घरफोडी मालक बाहेर गावी गेल्यानंतर झाल्या असल्याने नागरिकांनी बाहेर जाताना शेजारी व इतरांना सांगून जावे. मौल्यवान वस्तू सुरक्षित स्थळी किंवा सोबत घेऊन जावे.- सुनील नंदवाळकर ,डीवायएसपी ,अमळनेर