विविध मागण्यांसाठी भवानी नगर परिसरातील रहिवाशांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा.
प्रतिनिधी – एरंडोल शहरातील भवानीनगर या भागातील नागरिकांनी विविध नागरी समस्यांबाबत आज दि.5/8/2024 रोजी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी केले. भवानी नगर परिसरात गेल्या 40 ते 50 वर्षापासून विविध जाती धर्मातील नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या परिसरात रस्ते, गटारी नाहीत व महिलांसाठी, पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षापासून हा परिसर विकास कामांपासून वंचित आहे. सध्या पावसाळ्यामुळे सर्वत्र घाणीचे व चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे. पायी चालायला देखील नागरिकांना मोठी कसरत करावी लागतेसाथीच्या आजाराने ही डोके वर काढले आहे. या भागातील नागरिक नगरपालिकेचा नियमित कर भरतात तरीही नगरपालिका प्रशासन भवानी नगर मधील नागरी समस्या का सोडत नाही. नागरी सुविधा मिळणे हा आमचा हक्क असून नगरपालिका प्रशासनाने आमच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी अन्यथा नागरिक यापुढेही मोठे आंदोलन उभे करतील या आशयाचे निवेदन नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील, स्थापत्य अभियंता देवेंद्र शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रशासनाने भवानी नगर मधील नागरी सुविधा सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. मोर्चाचे एका छोटेखानी सभेत रूपांतर करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी यावेळी आपल्या मनोकामना सांगितले की, शहरातील नागरिक नियमित कर भरतात त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक भवानीनगर, केवडीपुरा व शहरातील अन्य भागाकडे दुर्लक्ष करत असेल तर नागरिक शांत बसणार नाहीत. म्हणून नगरपालिकेने लोकांच्या समस्या सोडण्यावर भर द्यावा जेणेकरून लोकांना मोर्चा वा आंदोलन करावे लागणार नाही. यावेळी तुकाराम फुलारी, सुमनबाई भोई यांनीही नगरपालिका प्रशासनाला जाब विचारत निषेध व्यक्त केला. भवानीनगर , गांधीपुरा ,जय हिंद चौक, भावसार गल्ली व मेन रोड मार्गे थेट नगरपालिकेवर मोठ्या संख्येने हा धडक मोर्चा नेण्यात आला. याप्रसंगी महिला नागरिक व विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भवानीनगर परिसरातील तुकाराम फुलारी, गोपीचंद भोई, ज्ञानेश्वर महाजन, रघुनाथ भोई, बापू कुंभार, आकाश भोई, श्रीराम फुलारी, छोटू भोई आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे देखील निवेदन देऊन दाद मागितली जाणार आहे.