पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीस क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्ण व कांस्य पदक
कापडणे प्रतिनिधी : नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे पो.अधीक्षक पी.आर.पाटील यांनी ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण पदक, एक कांस्य पदक मिळवत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ९ एम.एम. प्रकारात सुवर्ण पदक व एक कांस्य पदक प्राप्त करत या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला .
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यापूर्वी जळगाव, अमरावती, पंढरपूर, पुणे ग्रामीण येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले असून पुणे येथे गुन्हे शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत मोठमोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत तसेच सोलापूर शहर आयुक्तालय येथे एसीपी म्हणून उत्कृष्ट कार्य पार पाडले आहे. पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे पाटील यांनी सध्या नंदुरबार जिल्ह्यात मागील एक वर्षापासून पोलिस खात्याशी संबंधित तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.
पोलीस दलातील प्रशासकीय विभागात पोलीस अधीक्षक पदाची मोठी जबाबदारी पार पाडत असतांना देखील पी.आर.पाटील यांनी पोलीस दलातील क्रीडा क्षेत्रात आपली चमकदार कामगिरी सिद्ध करीत वेगळी छाप निर्माण केली आहे. पाटील यांच्या यशाचे नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.