सात ते आठ लाखाची खंडणी मागणी करणाऱ्या ८ जणांच्या टोळीचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या
एका पत्रकारांचा समावेश…..!
एरंडोल – येथे म्हसावद रस्त्यालगतच्या बालाजी ऑइल मिल मध्ये सात ते आठ लाखाची खंडणी मागण्याकरता आलेल्या पाच युवक एक महिला व दोन मुली अशा एकूण ८ जणांना रंगेहात छापा टाकून ताब्यात घेतले. छाप्याची चाहूल लागल्याने मिलच्या बाहेर उभे असलेले एक महिला व तीन पुरुष हे दोन दुचाकीवर म्हसावद नाका मार्गे जळगाव कडे पलायन करत असताना पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करून महामार्ग पोलीस केंद्र पाळधी व पाळधी दुरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पकडून ताब्यात घेण्यात आल्याची घटना १६ जानेवारी २०२३ रोजी घडली. विशेष हे की, या टोळीने यापूर्वी एका सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला अशाच प्रकारे धमकी देऊन खंडणी मागितल्याची जोरदार चर्चा आहे.
एरंडोल येथील बालाजी मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांना एक पुरुष व एका महिलेने त्यांच्या ऑइल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल असे धमकावून त्यांच्याकडून ७ ते ८ लाख रुपये खंडणी मागणी करण्यात आल्याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भाग ५ सी. सी. टी. एन. एस. गु.र. नंबर १३/ २०२३ भादवि कलम ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात खंडणी मागणारे इसम व महिला हे १६ जानेवारी २०२३ रोजी खंडणी मागण्या करता येणार असल्याचे फिर्यादी यांनी कळविले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहा. पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलीस नाईक मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, महिला पोलीस नाईक ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्या पथकाने दोन महिला व दोन्ही इसम हे खंडणी मागण्या करता ऑइल मिल मध्ये गेले असता एक महिला व तीन पुरुष ऑइल मिलच्या बाहेर थांबले होते. मिल मध्ये आलेल्या महिलेने अनिल काबरा यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेतली असता लागलीच तिला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. छाप्याची चाहूल लागल्याने ऑइल मिलच्या बाहेर उभ्या असलेल्या एक महिला व तीन पुरुष हे दोन दुचाकीवर म्हसावद नाका मार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून ताब्यात घेण्याची कामगिरी पोलिसांनी केली.
आरोपींमध्ये शशिकांत कैलास सोनवणे वय ३९ धंदा किराणा दुकान, प्लॉट नंबर २ द्वारका नगर भुसावळ, सिद्धार्थ सुनील सोनवणे वय २० धंदा शिक्षण रा. जे. टी. एस. रोड भुसावळ, रूपाली राजू तायडे रा. कुलकर्णी प्लॉट, धम्म नगर भुसावळ, मिलिंद प्रकाश बोदडे वय ३६ धंदा पत्रकार रा. तळणी ता. मोताळा जि. बुलढाणा, गजानन आनंदा बोदडे वय ३२ धंदा मजुरी रा. कुलकर्णी प्लॉट धम्म नगर भुसावळ, आकाश सुरेश बोदडे वय २२ वर्ष धंदा चालक रा. तळणी ता. मोताळा जि. बुलढाणा यांचा समावेश आहे.
आकाश बोदडे याने यापूर्वी वेळोवेळी बालाजी ऑइल मिल व कारवाई करण्याबाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करून अनिल काबरा यांच्याकडून ६० हजार ते ७० हजार रुपये रोख खंडणी घेतली आहे तसेच वरील आरोपींसोबत आपसात संगनमत करून अनिल गणपती काबरा यांना बालाजी मिल बाबत तक्रार करण्याची धमकी दाखवून त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणीची मागणी करून पैकी एक लाख खंडणी स्वीकारली आहे.
या धाडीत १ लाख रुपये रोख, ८ मोबाईल, २ दुचाकी, एक डिझायर कार असा एकूण १० लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींपैकी साक्षी तायडे व मोहिनी लोखंडे यांच्या वया बाबत साशंकता असल्याने त्यांना बाल सुधार गृह जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.