अवैध वाळू वाहतूकीला विरोध केल्यामुळे युवकांची हत्या
अमळनेर : अवैध वाळू वाहतुकीला विरोध केला म्हणून सहा जणांनी एकाच्या गुप्तांगावर फावड्याने वार करून त्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून जीवे ठार मारल्याची घटना १६ रोजी रात्री ९ ते १७ रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान सहापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
जयवंत यशवंत कोळी वय ३४ यांचे मांडळ येथे पायकेर शिवारात शेत असून शेतशेजारी नाला आहे. ११ रोजी रात्री जयवंत व त्याची पत्नी शुभांगी शेतात पाणी भरायला गेले असता मांडळ येथील अशोक लखा कोळी हा मोटरसायकल वर थांबून होता व त्याचे ट्रॅक्टर नाल्यात विशाल अशोक कोळी ,सागर अशोक कोळी ,विनोद अशोक कोळी , रोहन बुधा पारधी व पिंटू शिरपूरकर असे नाल्यातून रेती भरत होते. त्यावेळी जयवंत यांनी त्यांना रेती भरू नका , रस्ता खराब होतो म्हणून त्यांचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर परत केले होते. त्याचा राग येऊन अशोक द्वेषभावनेने पाहत होता. १६ रोजी रात्री ९ वाजता जयवंत शेतात मक्याला पाणी द्यायला गेला होता. १७ रोजी सकाळी सात वाजता जयवंत बनियन व निकर वर मयत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. लागलीच नातेवाईकांनी जयवंत यास खाजगी दवाखान्यात नेले असता त्याला तातडीने धुळे येथे नेण्यास सांगितले. जयवंत यांच्या गुप्तांगावर फावड्याने मारहाण करून तोडण्यात आले होते तसेच मान ,पाय ,कंबर फ्रँक्चर झालेले होते. शुभांगी कोळी हिने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की वरील सहा जणांनी जयवंत याचे गुप्तांग तोडून अंगावर ट्रॅक्टर चालवून त्याचा खून केला आहे. म्हणून सहा जंणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेचे वृत्त कळताच ए पी आय जयेध खलाने यांनी घटनास्थळी भेट दिली. डी वाय एस पी राकेश जाधव यांनी हॅम्पी श्वान व पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला बोलावले. विकास वाघ , किरण चौधरी , तसेच विनोद चव्हाण , शेषराव राठोड यांनी आरोपींच्या मार्गाचा मागोवा शोधला तसेच मयताची टोपी ,मफलर , कपडे यांच्यावरील रक्ताच्या डागाचे नमुने घेतले.
मयताचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे शव नातेवाईकांनी अमळनेर तहसील कार्यालयात आणले होते. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय प्रेत नेणार नाहीं अशी कठोर भूमिका घेतली होती. याच आरोपींनी त्रास दिल्याने यापूर्वी जयवंतच्या भावाने आत्महत्या केली होती त्यावेळी ते सुटून गेल्याने पुन्हा त्यांनी गुन्हा केला असा आरोप नातेवाईक करत होते. डीवायएसपी राकेश जाधव ,पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मयताच्या भाऊ व नातेवाईकांची समजूत काढून आरोपीना लवकर अटक केली जाईल व कोणालाच माफ केले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानन्तर शवं अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. मांडळ येथे आरसीएफ पालटून व अमळनेर पारोळा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.