अमळनेर पोलिसांची कारवाई गुन्हेगारांवर आणली संक्रांत….
अमळनेर – येथील काही गुन्हेगार अतिशय आक्रमक पद्धतीने सक्रिय आहेत. त्यापैकी दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ ह्या गुन्हेगारावर अमळनेर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच एम.पी.डी.ए. ची परिणामकारक कारवाई करून नाशिक रोड येथील सेंट्रल जेलला स्थानबद्ध केले आहे. या कार्यवाहीचा अंमळनेर करांकडून खूप चांगले समर्थन करण्यात आले होते व आता पुढची अशी कार्यवाही कोणावर होणार याबाबत अंमळनेरचे लोक चर्चा करून अंदाज लावत होते.
त्यातच अमळनेर पोलिसांकडून आज अशा कार्यवाहीचा दुसरी धक्कादायक बातमी मिळाली की, अमळनेर शहरात व परिसरात अत्यंत दहशत व गुंडागर्दी करणारा शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख याच्यावर आज एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत नाशिक रोड येथील सेंट्रल जेलला स्थानबद्ध करण्यात आल्याची मोठी व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे. शुभम यास ताब्यात घेऊन स्थानबद्धतेसाठी सेंट्रल जेल नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.
शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद देशमुख हा अमळनेर येथील पिंपळे रोड, संविधान चौकात राहणारा असून त्याच्या बाल वयापासूनच गुन्हे करण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्यावर एकूण आजपावेतो २७ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या दहशतीमुळे या व्यतिरिक्तही अनेक लोक पीडित झालेले असुनही त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची हिम्मत केलेली नाही. त्याच्यावर घरफोडी करण्याचे बेकायदेशीर हत्यार बाळगून, लोकांना दहशत घालने, पोलिसांच्या रखवालीतून पळून जाणे, पोलीस पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर शस्त्रानिशी हल्ला करणे, गंभीर जखमी करून दरोडा टाकणे, घरात घुसून जबरी चोरी करणे, मोटर सायकल चोरी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या स्वतःचे नातेगोते न पाहता त्याची पत्नी व सासू-सासरे यांना देखील जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला असल्याने तिला देखील तिच्यावर ऍसिड टाकून बरबाद करण्याची धमकी दिली होती. स्वतःच्या सर्व गरजा व मौज आणि मजा करण्यासाठी तो सर्व दुकानदार हॉटेल यांच्याकडून फुकट घेणे, हॉटेल मध्ये फुकट दारू पिऊन महागडे जेवण करणे व पैसे मागितले तर त्यांच्यावर शस्त्रानिशी हल्ला करणे असे दुष्कृत्य तर तो नेहमी करत असे अमळनेर तेथील व्यापारी, दुकानदार हॉटेल व्यवसायिक त्याच्या क्रूर कृत्यांना व खूनशी वृत्तीला कंटाळले होते व आता हे निमूटपणे सहन करण्यापलीकडे काहीच मार्ग उरला नाही अशी लोकांची भावना झाली होती. कोर्टात त्याच्या भीती व दहशतीमुळे कोणी साक्ष देण्यास देखील तयार नव्हते.तथाकथित ठेकेदार त्याला सोडवून आणण्यात पारंगत होते. त्यातच शुभम वर एम.पी.डी.ए.ची कारवाई करून अमळनेर पोलिसांनी एक सुखद धक्का जनतेला दिला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून अमळनेर पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे साहेब यांनी चार्ज घेतल्यापासून अशा गुन्हेगारांवर कठोर व परिणाम कारक कार्यवाही करीत आहेत. या एका पाठोपाठ एक धडाकेबाज कामांचे अंमळनेर करांकडून स्वागत होत आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे देखील अतिशय ताकदीने व ऊर्जेने त्यांच्या सोबत सहभागी उभे आहेत. *त्यात प्रामुख्याने पोहवा/किशोर पाटील, पोना/दीपक माळी, पोना/रविंद्र पाटील, पोना/सिद्धांत सिसोदे पोउनी/विकास शिरोडे असे लोक अग्रेसर आहेत.* तसेच हजेरी मास्तर सफो/संजय पाटील, पोहवा/कपिल पाटील, पोना/हितेश चिंचोरे, पोका/जितेंद्र निकुंबे चापोहवा/मधुकर पाटील, चापोहवा/योगेश पाटील, चापोका/सुनील पाटील, शरद पाटील अशांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जिल्ह्यात अशा गुन्हेगारांवर या प्रकारची परिणामकारक कारवाई झाल्या पाहिजेत असे मा.पोलीस अधीक्षक जळगाव श्री.एम. राजकुमार यांचे आदेश आहेत. त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन अमळनेर पोलिसांनी मा.अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव श्री.रमेश चोपडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर, श्री राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात व चर्चा करून कारवाई केल्या आहेत..
आपल्या गुन्हेगारी वृत्तीने जनतेस वेठीस धरणारे गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांनी निक्षून सांगितले आहे..
सन-२०२३ या वर्षातील जळगाव जिल्ह्यात एम.पी. डी. ए.ची पहिली कार्यवाही करण्याचा व दुसरी देखील कार्यवाही करण्याचा मान अंमळनेर पोलिसांनी मिळविलेला आहे..