महिला डॉक्टरला ५ वर्षांची शिक्षा ; जाणून घ्या… नेमक प्रकरण काय?
परवाना नसताना गर्भपात ; महिलेचा मृत्यू….
एरंडोल (प्रतिनिधी) गर्भपाताचा परवाना नसतानाही गर्भपात केल्यानंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉ. सुरेखा शामलाल तोतला यांना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी ५ वर्षांची सश्रम कारावासाची व एकत्रित ५२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर बातमी अशी की, डॉ. सुरेखा तोतला (४०, रा. मारवाडी गल्ली, एरंडोल) यांनी २२ जून २०१२ रोजी कुसूमबाई बाळासाहेब मराठे (३५, रा. टोळी, ता. एरंडोल) यांचा गर्भपात केला. त्यानंतर अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहन बनकर यांच्या फिर्यादीवरून २३ जून २०१२ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात तोतला यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४, २०१ सह एमटीपी अॅक्ट ५ (३) (४) नुसार गुन्हा दाखल झाला होता. बनकर यांनी गुन्ह्याचा तपास करून तोतला यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर बुधवारी जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी ५ वर्षांची सश्रम कारावासाची व एकत्रित ५२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.