गुटखाबंदी असतांनाही
पाचोरा शहरासह तालुक्यात
गुटख्याची खुलेआम विक्री….
पाचोरा : तारखेडा येथे अवैधरित्या साठविलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 26 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचदरम्यान, एका आरोपीला अटक करण्यात आली तर दोन आरोपी फरार झाले. या प्रकरणी तीन आरोपींविरूद्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष, पाचोरा तालुक्यात पहिल्यांदाच पोलीस पथकाने गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस सूत्रानुसार, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख (भा.पो.से), यांना पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील तारखेडा खु. येथे एका गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटखा साठवुन ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकातील पो.ना. राजेंद्र निकम,
पो.शि. अजय पाटील, पो.शि. महेश बागुल यांना तात्काळ रवाना केले, गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा छापा टाकला.
या कारवाईत 26 लाख 86 हजार 368 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला पोलीस काँ. अजय अशोक पाटील चाळीसगाव पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्याद वरून आरोपी अनिल काशिनाथ वाणी, दिलीप एकनाथ वाणी, गोकुळ एकनाथ वाणी यांच्या विरोधात पाचोरा पोलिसात विविध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अनिल काशिनाथ वाणी यास अटक करण्यात आली असून दिलीप वाणी व गोकुळ वाणी हे फरार झाले आहेत. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे व पथक करीत आहे.