राज्यात पुन्हा हुडहुडी वाढणार, ८ फेब्रुवारीनंतर राज्यातील ‘या’ भागात गारठा वाढणार, यात तुमचा जिल्हा आहे का?
मुंबई : सध्या राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. निम्मापेक्षा अधिक महाराष्ट्र गारठला आहे. उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवात तसेच काश्मिरातील बर्फवृष्टी यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झाली. यामुळं कमालीची थंडी वाढली असून, सर्वंत्र हुडहुडी वाढली आहे. तसेच आता उत्तर भारतात चक्रवातामुळे बुधवार ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान पाऊस,बर्फवृष्टीची शक्यता असल्याने बुधवारनंतर राज्यात पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. या थंडीचा आरोग्यावर देखील परिणाम होत असून, दमा, श्वसनाचे विकार व आजार असणाऱ्यांना या थंडीमुळं त्रास होतोय, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. प्रचंड थंडीमुळं गारठलेले नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.
८ फेब्रुवारीनंतर थंडी वाढणार.
दरम्यान, रविवारी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान घसरल्याने वातावरणात गारवा होता. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, या ठिकाणी किमान तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे थंडी जाणवत होती. दरम्यान, राज्यात आगामी काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका शेती पिकांवर होणार आहे. हवामान विभागाकडू राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर भारतात चक्रवातामुळे पुन्हा ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान पावसाचा आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वातावरणावर त्याचा परिणाम होऊन उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये दाट धुके राहणार आहे. परंतु राज्यात किमान तापमानाची परिस्थिती स्थिर राहणार असून वातावरणात गारठा राहणार आहे.