एरंडोल तालुक्यात सहा हजार शिधापत्रिका धारकांना मिळतो वीस रुपये किलो साखरेचा गोडवा…
एरंडोल:- तालुक्यात अंत्योदय कार्ड धारकांना गहू तांदूळ सोबत वीस रुपये किलो दराने एक किलो साखर स्वस्त धान्य दुकानांद्वारे वितरित केली जाते. धान्यासोबत साखरेचा गोडवा मिळणाऱ्या लाभधारकांची संख्या पाच हजार ९४८ इतकी आहे. अशी माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण व पुरवठा अधिकारी संदीप निळे यांनी दिली आहे. अंत्योदय कार्ड धारकांना (पिवळे कार्ड) ३५ किलो धान्य व वीस रुपये दराने एक किलो साखर वितरित केली जाते असे सांगण्यात आले.
एरंडोल तालुक्यात शिधापत्रिका धारकांची संख्या २५ हजार ४०० इतकी आहे. तर स्वस्त धान्य दुकानांची संख्या ८५ आहे. त्यात एरंडोल ९, कासोदा ८, आडगाव ३, तळई, उत्राण अहिर हद्द, पिंपळकोठा बुद्रुक या गावांना प्रत्येकी दोन, याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानांची संख्या आहे. मात्र रिंगणगाव ,उत्राण गुजर हद्द या गावांना एकच स्वस्त धान्य दुकान आहे. तालुक्यातील कढोली, भातखेडे, ताडे, निपाणे, जळू, रवंजे बुद्रुक , रवंजे खुर्द, खडके बुद्रुक, यासारख्या गावांना स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढविणे काळाची गरज आहे. तालुक्यातील गावांच्या लोकसंख्येत वाढ झालेली असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढणे आवश्यक आहे नवीन स्वस्त धान्य दुकाने दिल्यास ग्रामीण भागातील जनतेची सोय होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.
प्राधान्य कुटुंब योजनेचे कार्ड धारक लाभार्थी एकोणावीस हजार चारशे इतके आहेत. त्यांना दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वितरण केले जाते मात्र साखरेचा लाभ त्यांना मिळू शकत नाही.२०२३ या वर्षापासून नियमित धान्य लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात येत आहे.
दरम्यान प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य डिसेंबर २०२२ पर्यंत देण्यात येत होते नवीन वर्षापासून ते बंद करण्यात आले आहे. एरंडोल तालुक्याला दर महिन्याला साडेसहा हजार क्विंटल गहू तांदूळ पुरवठा केला जातो तर ५८ क्विंटल साखर पुरवली जाते.
पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार धान्य वेळेत येते व वेळेवर स्वस्त धान्य दुकानदारांना पोहोचविले जाते तर मग आम्हाला धान्य मिळाले नाही अशा तक्रारी नागरिकांच्या कशा येतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य नियमितपणे कसे मिळेल यासाठी तालुक्यातील पुरवठा शाखेने विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा असे जाणकार यांचे मत आहे.
कोट
लाभार्थ्यांनी आप आपल्या आधार सिडिंग स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत लवकरात लवकर करून घ्यावे
सुचिता चव्हाण
तहसीलदार एरंडोल