बारावीच्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेवर शिक्षक संघटनांचा बहिष्कार…..
एरंडोल:-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास फेब्रुवारी / मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते ही परीक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक हे तांत्रिक सहाय्यक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर अनेक कामे सहज शक्य होत आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, शाळा महाविद्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ,शाळांचे शालार्थ आयडी ,शालार्थ प्रमाणपत्राद्वारे वेतन, त्यांचे प्रशिक्षण, सरल प्रणाली, यु-डायस ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण, या सर्व गोष्टी प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञान शिक्षक गेली २१ वर्षे फक्त पाच हजार रुपये एवढ्या मानधनावर कार्यरत आहे. याबाबत शासन वेतन अनुदान बाबत कोणताही निर्णय घेत नाही.
उच्च माध्यमिक स्तरावर माहिती तंत्रज्ञान विषयी शिक्षकांना वेतनपोटी अनुदानाची वेतन तरतूद करण्यासाठी शासनाने माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण केली आहे.
दरम्यान ही फाईल गेली २१ वर्षापासून शासन निर्णयासाठी प्रलंबित आहे.या शिक्षकांचे वेतन अनुदान मिळावे, त्यांची २००१/०२ पासून सेवाग्राह्य धरण्यात यावी आदी मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
राज्यात दोन हजार पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले. असून त्यामुळे एक लाख साठ हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान या विषयाची ऑनलाइन परीक्षा देतांना असुविधेचा सामना करावा लागेल. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, सचिव विशाल शिंदे ,उपाध्यक्ष नितीन राऊळवार , नंदकुमार जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार यांनी दिली आहे.