शास्त्री महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.
एरंडोल येथील शास्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये १९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला यावेळी शास्त्री फाऊंडेशन चे अध्यक्ष व प्राचार्य डॉ विजय शास्त्री आणि सेक्रेटरी सौ रूपा शास्त्री हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ पराग कुलकर्णी होते. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ विजय शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष आणि सर्व सामान्य रयतेचे राज्य निर्माण केल्याचे सांगून त्यांनी निर्माण केलेली राज्य व्यवस्था आजही जगातील सर्व राष्ट्रांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले. सोळाव्या शतकात शिवरायांनी अवलंबिलेले उच्च दर्जाचे व्यवस्थापन युगानुयुगे सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे असून जागतिक स्पर्धेच्या या कालखंडात तरुणाईने शिवरायांचे इतिहासातून उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिकत वेळेचे व्यवस्थापन, अखंड कार्य करण्याची शक्ती, प्रसंगी पराभव पचविण्याचे धैर्य, नियोजन, आउट ऑफ बॉक्स थिंकींग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वृद्धिंगत करीत समाजहीत जोपसावे असे भावनाप्रधान विधान डॉ विजय शास्त्री यांनी केले. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची, मावळ्यांची आणि एकंदरीतच समाजाची घेतलेली निगा शत्रूला नामोहरम करण्यासाठी अवलंबिलेले गनिमी काव्याचे अनेकानेक दाखले देत डॉ विजय शास्त्री यांनी शिवरायांचे चरित्र अवलंबित आजच्या युगात सचोटी, व्यवहार कुशलता व प्रसंगी वापरावयाच्या रणनीती आणि राष्ट्रहित तरुणाईला अनेकानेक दाखले देत पटवून दिले.
आपल्या दैनंदिन आचरणातून शिवरायांचे आदर्श तथा जिजाऊ मातोश्रींचे बाळकडू आणि संस्कार सिद्ध व्हावेत अशा आचरणाचा स्वीकार करण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ पराग कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा अजिंक्य जोशी यांनी शिवचरित्र अभ्यासत युवकांनी इतिहासाचा सकारात्मक दृष्टिकोनातून समाज हितासाठी वापर करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण संदेशही दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी राहुल निळे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी महाराजांना मानवंदना दिली व शिवचरित्र कथाकथन, पोवाडा गायन, कविता व नाटक असे विविध कार्यक्रम महाविद्यालयात सादर केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा सुनील पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा जावेद शेख, प्रा सतीश ब्राह्मणे, प्रा करण पावरा कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.