गंधमुक्तिच्या विधीसाठी जात असतांना डंपरच्या धडकेत दुचाकीचालक ठार;मुलाच्या डोळ्यादेखत पित्याचा हदयद्रावक मृत्यू..!
एरंडोल: दहीगाव संत ता.पाचोरा येथे नातेवाईकाच्या गंधमुक्त विधीसाठी दुचाकीने जात असतांना भरधाव वेगाने जाणार्या डंपरने दुचाकीस जबर धडक दिली त्यात दुचाकीचालक श्रावण दगा पाटील (वय६७वर्षे) यांच्या अंगावरून डंपर गेल्याने ते जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागे बसलेला मृताचा मुलगा अमोल श्रावण पाटील हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. ही दुर्घटना २७फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ८वाजेच्या सुमारास एरंडोल-म्हसावद रस्त्यावर निखिल पेट्रोलपंपानजिक घडली.
त्यानंतर डंपरचालक पोलिस स्टेशनला हजर झाला.
अमोल श्रावण पाटील रा.कल्याणे खुर्द ता.धरणगाव हा त्याचे वडील श्रावण पाटील यांचेसोबत एम.एच.१९ ए.झेड्.११२१ क्रमांकाच्या दुचाकीने एरंडोल कडून म्हसावद कडे जात होते. वाटेवर निखिल पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना म्हसावदकडून येणारा एम.एच.१५ एफ.व्ही.७७०७ क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने येऊन दुचाकीवर धडकला त्यात श्रावण पाटील हे पुढील चाकात आल्याने त्यांच्या अंगावरून डंपर गेल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले.
अमोल पाटील हा पेट्रोल पंपाच्या दिशेला फेकला गेला.
त्यावेळी पंपावरील कर्मचारी व आजुबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले व त्यांनी ट्रँक्टरने श्रावण पाटील यांना एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती ते मृत झाल्याचे घोषीत करण्यात आले.
याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.