वाळू वाहतूकीच्या वादातून युवकाचा खून
प्रतिनिधी एरंडोल- : अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून धारदार शस्त्रांनी वार करीत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही थरारक घटना रविवारी सकाळी भातखंडे – उत्राण ता. एरंडोलनजीक घडली. सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पाटील हा रविवारी सकाळी दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत नेले. त्यावेळी वाहनातून आलेल्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अर्धा तास पडून असलेल्या सचिनला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या चुलत भावाने पाचोरा येथील रुग्णालयात आणले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. जरी आरोपींनी खुनाची घटना दडपण्यासाठी तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचीही प्राथमिक माहिती आहे. कासोदा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. नेमका हा खून करण्यामागचे ठोस कारण जरी समोर आले नसलेतरी वाळू वाहतुकीतील स्पर्धा व वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, कासोदा निरीक्षक निता कायदे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.