अमळनेर शहरातून संतूर साबणाचा ५५ लाखाचा माल लांबवला दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा ..
प्रतिनिधी – अमळनेर शहरातून संतूर साबणाचा ५५ लाखाचा माल चोरून नेणाऱ्या सराईत टोळी पैकी दोघं सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असून दोघे आरोपी फरार झाले आहेत.
ट्रक मध्ये ट्रान्सपोर्ट ने माल वाहतूक करण्यासाठी राजस्थान येथील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेरमधून संतूर साबणाच्या ५५ लाख ९७ हजार ७६० रुपयांचा ९८० साबण पेट्या असलेला ट्रक क्रमांक आर जे ११, जी ए ८१३८ भरला. धुळे मालेगाव मार्गे जाताना चालकाने दिशाभूल करून तेथून नवापूर मार्गे सुरत ,अहमदाबाद गेला. प्रत्येक वेळी टोल नाक्यावरून जाताना तो फास्ट टॅग बदलवत असल्याने ट्रक क्रमांक बदलत होते. गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी वय ३१ राहणार जयपूर याने त्याचवेळी त्याच क्रमांकाचा ट्रक रावेर येथून रवाना केलेले दाखवले होते. त्यामुळे पोलिसांनाही नेमका तपास उमजत नव्हता.ज्या क्रमांकवरून चालक आधी बोलला त्याचे लोकेशन दुसरीकडेच येत होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे ,पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख , हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर , कॉन्स्टेबल निलेश मोरे ,मिलिंद भामरे ,उज्वल पाटील यांचे दोन पथके विविध दिशेला रवाना केले होते. दोन वेळा पथक रिकाम्या हाताने माघारी फिरले होते. पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. निलेश मोरे यांनी सिडीआर लोकेशन वरून चालकाने आपल्या प्रेयसीला केलेल्या कॉल वरून तिचा दुसरा संपर्क नंबर शोधला. परंतु चालकाच्या प्रेयसीच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसाचा नम्बर ब्लॉक केला. प्रेयसीचा बिकानेर येथील पत्ता शोधून फोटोवरून माहिती काढली असता सुनील भार्गव याने कैलास गुजर हे नाव बदलवले असल्याचे लक्षात आले. तो अनिल बाबूलाल भार्गव आणि नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी यांच्या सोबत मोठ्या चोऱ्या करत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना स्वामी चा नम्बर मिळाला मात्र तो देखील आपला मोबाईल काही किमी अंतरावरून बंद करत होता. आरोपीला पकडायचेच म्हणून निलेश मोरे कॉन्स्टेबल ने सतत सात दिवस आरोपीच्या घराबाहेर पहारा देऊन काढले. तरी आरोपी सापडला नाही. आरोपी स्वामी हा हैद्राबाद ते जयपूर रेल्वे ने एसी कोच मधून येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून मोरे रस्त्यातील चितोडगड स्टेशनवर पोहचले. दुसरे पथक भिलवाडा स्टेशनवर थांबले. चितोडगड स्टेशनवरून मोरे रेल्वेने प्रवास करू लागले. भिलवाडा स्टेशनवर तयार असलेल्या पथकाने गाडी थांबताच स्वामीवर झडप घातली आणि त्याला पकडले. त्याच्यासोबत हारून रशीद साजिदखान वय ३८ यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १८ लाख ५६ हजार ४०० रुपये किमतीच्या ३२५ साबणाच्या पेट्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.