अजंगला 4 डंपर पकडले; ग्रामस्थांकडून यंत्रणेच्या ताब्यात
अजंग (ता. धुळे) शिवारात गौण खनिजाची चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार करत काही ग्रामस्थांनी चार डंपर सोमवारी (ता. ३) रात्री अकराच्या सुमारास पकडले. या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहेअजंग शिवारातील गट क्रमांक ३५७ येथील पाझर तलावातून अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीच्या चार डंपरद्वारे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी रात्री चारही वाहने अडविली. नंतर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार व राकेश मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तपासणीत चार डंपरमध्ये मुरूम आढळला.
वाहनचालकांकडून रॉयल्टीची पावती उपलब्ध झाली नाही. पोलिसांनी पंचनामा करून चार डंपर धुळे प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आणले. अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चरकडून धुळे ते जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम सुरू आहे.भरावासाठी अजंग शिवारातील पाझर तलावातून महसूल यंत्रणेच्या संगनमतातून अवैधरीत्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार माजी सरपंच डॉ. दिनेश माळी, किशोर अहिरे, चेतन गायकवाड, प्रदीप माळी, उमेश माळी, योगेश माळी आदींनी केली. ठोस कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांकडे तक्रार करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.