घर मालकाला लग्न पडलं महागात..
घरमालक लग्नकार्याकरिता पश्चिम बंगाल येथे गेले असताना संधी साधून घरातील २६ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नोकर पसार झाला होता. त्या आरोपी नोकर हंसपुरी गोस्वामी याला अखेर मुंबई गुन्हे शाखेने गुजरातच्या राजकोट शहरात पकडले.त्याच्याकडून नऊ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अलका विष्णुकुमार गुप्ता या आरोपी नोकर हंसराज गोस्वामी याच्या ताब्यात घर देऊन लग्नकार्यासाठी पश्चिम बंगाल येथे गेल्या होत्या. हीच संधी साधत गोस्वामी याने घरातील तीन लाख ३० हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा २६ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने सुरू केला होता. तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता हंसराज गोस्वामी हा गुजरातच्या राजकोट शहरात लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट-५ च्या पथकाने राजकोट गाठून हंसराजच्या मुसक्या आवळल्या. पुढील कारवाईसाठी त्याला दादर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.