फिनेलच्या पाण्यामुळं ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
सातारा: नऊ महिन्याचं बाळ नुकतच दूडुदूडु चालायला लागलं होतं, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होतं. तीन मुलीनंतर चौथा मुलगा झाला होता. गेली नऊ महिने बाळाला लाडाकोडात वाढवला जात होत, पण अचानकच नियतीने त्याच्यावर घाला घातला. मोर्वे (ता. खंडाळा) येथील नऊ महिन्यांचे चिमुकलं बाळ फरशी पुसण्यासाठी असलेल्या फिनेलच्या बादलीतील पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे तर. चिमुकल्यासोबत घडलेल्या प्रकाराने मोर्वे गावात शोककळा पसरली आहे.
खंडाळा तालुक्यातील शेतकरी कुटुंब असलेल्या मोर्वे येथील अशोक महादेव धायगुडे यांना तीन मुलींच्या पाठी मुलगा झाला. घरात आनंदाचे वातावरण होत. बाळ जन्मल्यापासूनच त्याची काळजी घेतली जात होती. घरात सहा- सात माणसं. त्यामुळे बाळाचे लाड पुरवण्यास कोणीही कमी पडत नव्हते. प्रत्येकाचं त्याच्या हालचालीवरही लक्षही राहत होतं. रांगणारे बाळ आता थोडं थोडं चालू लागलं होतं. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. पण नियतीने त्यांच्यापुढे काय मांडून ठेवलं होतं, कोणास ठाऊक!
नेहमीप्रमाणे घरातली काम प्रत्येक जण करत होता. बाळाची आई फरशी पुसून कचरा बाहेर टाकण्यासाठी बाहेर पडली, पण मागे विचित्रच घटना घडली. घरात एवढी माणसं होती पण बाळाने सगळ्यांचा डोळा चुकवून फरशी पुसण्यासाठी पाण्याने भरून घेतलेल्या बादलीकडे धाव घेतली आणि हीच धाव त्याची शेवटची धाव ठरली. आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मोर्वे येथील अशोक महादेव धायगुडे यांच्या राहत्या घरात नेहमीप्रमाणे स्वच्छता करण्याचे काम सुरू होत. त्यावेळी फरशी पुसण्यासाठी बादलीतील पाण्यात फिनेल टाकून ठेवले होत. फरशी पुसण्याच काम झाल्याने ती बादली एका बाजूस ठेवली होती. मात्र, त्यावेळी घरातील लोकांचा डोळा चुकून बाळ श्रीनाथ अशोक धायगुडे (वय ९ महिने ) त्या बादलीपर्यंत पोहोचल. कोणाच्याही ध्यानीमनी नसतानाही बादलीत घेतलेल्या फिनेलच्या पाण्यामध्ये पडले. ही बाब घरातल्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास उपचारास लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल केल. पण या कोवळ्या जीवाला फिनेलचा वास सहन न झाल्याने ते गुदमरून त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे कळताच कुटुंबीयांचा हंबरडा पिळवटून टाकणार होता.
या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात विक्रम धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस फौजदार वळवी अधिक तपास करत आहेत.