ईद व आखाजी सण एरंडोल येथे उत्साहात साजरा.
प्रतिनिधी – एरंडोल येथे आखाजी व ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी हिंदु – मुस्लिम बांधव ईद निमित्त एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देत होते तर हिंदू बांधव पुरणाची पोळी व आंब्याच्या रसाचे जेवण तयार करुन घागर भरुन आपल्या पूर्वजांची आठवण करीत होते.
शहरात ईद निमित्त शहरातील शिवाजी नगर येथील इदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली तसेच शहरात पाच ठीकणी ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली.यात शिवाजी नगर येथील ईदगाह मैदानावर सकाळी ८:१५ वाजता, दर्गाह अली मस्जिद मेनरोड ८ वाजता,मस्जिद अली येथे ८:१५ वाजता,कागदी पुरा मस्जिद येथे ८:३०, बरकन दास मस्जिद येथे ८:३० वाजता नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.यावेळी महिला व पुरुषांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन येत होता.
अक्षय तृतीया निमित्त सकाळीच अनेक घरांसमोर खापर लावुन पारंपरिक पद्धतीने पुरण पोळी बनवत गृहिणी दिसुन आल्या तसेच त्यानंतर पूर्वजांना आठवण करत घागरी भरल्या गेल्या तसेच दुपारी महिलांनी मनसोक्त झोक्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद बागल,पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला व मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.तसेच कै.शांताराम दादा चौकात भाजप जनजाती क्षेत्र प्रमुख ॲड.किशोर काळकर,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,देविदास महाजन,प्रकाश चौधरी,पोलीस निरीक्षक सतिष गोराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे,अनिल पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या तर नविन उड्डाण पुलाजवळ प्रा.मनोज पाटील,नितीन चौधरी, डॉ.राजेंद्र देसले आदींनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.