महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत
पुरुषांसाठी “सुधारक सन्मान”पुरस्काराचे आयोजन

images-21.jpeg

प्रतिनिधी जळगाव : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, जळगावमार्फत नवतेस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लिंग समभाव, अन्न सुरक्षा, सकस आहार व आरोग्य या घटकांतर्गत महिला सक्षमीकरणाकरीता संवेदनशील व गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या पुरूषांचा “सुधारक सन्मान”पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या उपक्रमाचा मूळ हेतू म्हणजे गावस्तरावर “Men Gender Sensitive Role Model” तयार होणे व महिला सक्षमीकरणाकरीता पुरक वातावरण तयार करणे हा आहे. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी महिलांचे हक्क व अधिकार यासाठी लढा दिला. महिलांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क व शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे क्रांतिकारक काम केलेले आहे. या दोन महापुरुषांच्या कार्याची प्रसिध्दी जगभर आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांची 11 एप्रिल 2023 रोजी 196 वी जयंती व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023 रोजी 132 वी जयंतीनिमित्ताने एप्रिल महिन्यात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असलेल्या पुरुषांचा “Gender Sensitive Role Model” म्हणून “सुधारक सन्मान”हा उपक्रम माविममार्फत हाती घेतला आहे.
जिल्ह्यात माविम स्थापित 5 लोकसंचलित साधन केंद्रांच्या (CMRC) कार्यक्षेत्रातील 125 गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम तीन स्तरावर आयोजित करण्यात येत आहे प्रथम गावपातळी वरून पात्र पुरूषांची निवड करण्याकरीता त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात यावी. ज्यामध्ये गावस्तरीय समिती अध्यक्ष, पोलिस पाटील व अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. सहयोगिनी या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून भूमिका बजावेल. या समितीने दोन पात्र पुरूषांची निवड करून CMRC कडे अंतिम निवडीकरीता लोकसंचलित साधनकडे पाठविल. व्दितीय स्तर तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ज्यामध्ये गटविकास अधिकारी, पोलीस निरिक्षक, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आहे. CMRC व्यवस्थापक या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून आहेत. ही समिती प्रती गाव एक याप्रमाणे पात्र पुरूषांची निवड अंतिम करेल. म्हणजेच CMRC मध्ये असलेल्या 25 गावामधून एका पुरुषाचा सत्कार करेल. तृतीय स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठीत केली आहे. ज्यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा महिला सल्लागार समिती सदस्य यांचा समावेश आहे. माविम जिल्हा समन्वय अधिकारी या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून असतील. या समितीकडे तालुकास्तरावरून पात्र पुरुषांची नामनिदर्शन प्राप्त होतील त्यास अनुसरुन जिल्हा स्तरावरून अंतिम 3 पुरुषांची “सुधारक सन्मान”या पुरस्काराकरीता निवड केली जाणार आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे, 2023 रोजी जिल्हास्तरावरील तीन निवडलेल्या पुरुषांचा सत्कार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे. असेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!