भारतीय स्टेट बँकेचे ढिसाळ नियोजनामुळे होत आहे सर्व सामान्यांना त्रास.
एरंडोल प्रतिनिधी – येथील भारतीय स्टेट बँक ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच मारवाडी गल्ली येथे आहे . याठिकाणी सदर बँकेची इमारत ही छोटी असल्याने बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांना पुरेशी होत नाही.त्यात बँकेतील कर्मचारी आपली मनमानी करत असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या आहेत.तसेच एका कामाला तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याची देखील तक्रार आहे.वारंवार बँकेचे सर्व्हर डाऊन होत असते.त्यात जर लाईट गेली तर जनरेटर देखील याठिकाणी चालू नसते.पैसे भरणा व पैसे काढण्याच्या ठिकाणी बसलेल्या काऊंटर वरील कर्मचारी खुपच संथ गतीने काम करत असल्याच्या व अरेरावी पद्धतीने बोलत असल्याच्या देखील तक्रारी आहेत.दरम्यान काही कामं कर्मचारी न करता स्वतः ग्राहकांना करावी लागत असल्याची देखील तक्रार आहे.
शहरातील ए. टी.एम.मशीन बंद
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील बँकेचे एकुण तिन ए. टी.एम.देखील बंद असुन त्यांना प्रॉब्लेम असल्याने ते बंद असल्याचे बँके कडून सांगण्यात आले.काही दिवसांनी त्याचा ऑपरेटर येणार असुन लवकर ते सुरु होतील असे सांगण्यात आले आहे.परंतु अनेक दिवसांपासून हे मशीन बंद असुन ऑपरेटर कधी येईल ? असा प्रश्न बँकेच्या ग्राहकांनी केला आहे.ए. टी.एम.मशीन बंद असल्याने लोकांची गर्दी होते.त्यात तापमान वाढीमुळे बँकेत पुरेशी जागा नसल्याने येणाऱ्या ग्राहकांची मोठी असुविधा होत आहे.तासनतास त्यांना एखाद्या खुराड्यात कोंडल्यासारखे वाटतं असल्याचे देखील ग्राहकांनी सांगितले.
बँकेची जागाच चुकीच्या ठिकाणी
सदर बँकेची जागाच मुळात चुकीच्या ठिकाणी असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.कारण मारवाडी गल्लीत अनेक दुकान असुन सदर गल्ली अरुंद असुन याठिकाणी काहींचा रहिवास देखील आहे.सकाळी ११ वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत याठिकाणी खुप गर्दी असते.त्यात बँकेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असल्याने त्यांना गाडी लावायला जागा नसते व त्यामुळे नाईलाजाने गाड्या रस्त्यावर लागतात व क्षणाक्षणाला याठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते.यामुळे याठिकाणी राहणाऱ्या रहिवासी व दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.बँकेने लवकरात लवकर नवीन जागेत स्थलांतर करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून बँकेच्या ग्राहकांची आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी देखील आहेत.