विकास सोसायटीचे पिक कर्ज मिळण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी ..
अमळनेर : विकास सोसायटीचे पिक कर्ज मिळण्यासाठी सोमवारी जिल्हा बँकेत गर्दी झाली होती. त्यात नेट बंद झाल्याने शेतकऱ्यांना वेळेत रक्कम मिळत नव्हती म्हणून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
पेरणीची वेळ जवळ आली की शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीतून कर्ज काढत असतो. शेतकऱ्यांना पीक कर्जाची रक्कम जिल्हा बँकेतुन मिळते. एकाच वेळी जिल्हा बँकेवर भार पडू नये म्हणून बँकेने शेतकऱ्यांना एटीएम सारखे किसान कार्ड दिले होते. काही कार्डाची मुदत मार्च २०२३ मध्येच संपली. त्यामुळे त्या द्वारे पैसे निघत नाहीत. बँकेत आले तर किसान कार्ड दिले आहे म्हणून विड्रॉल स्लिप वर पैसे मिळत नाही. किसान कार्ड नवीन मागितले तर बँकेकडे कार्ड शिल्लक नाहीत. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची एकच गर्दी उडत आहे. शेतकऱ्यांना बचत खाते आणि विकासो खात्याची अशा दोन स्लिप भरायला लावल्या जात आहेत. अनेक शेतकरी अनाडी असल्याने गोंधळ होत आहे. बँकेकडे आधीच कर्मचारी कमी त्यात लगीन सराई यामुळे काही रजेवर आहेत. त्यात रक्कम देखील नसल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पाच दिवसात या म्हणून सांगितले जात आहे. भर उन्हात ग्रामीण भागातून शेतकरीना दोन तीन वेळा फिरावे लागत आहे.
शनिवार ,रविवार सुटी असल्याने सोमवारी बँकेत एकच गर्दी झाली होती. त्यात नेट बंद पडल्याने प्रक्रिया थांबल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. शुक्रवारी स्लिप भरून दिलेल्या शेतकऱ्यांच्या रकमा सोमवारी जमा केल्या जात होत्या. जिल्हा बँकेने जादा कर्मचारी देऊन शेतकऱ्याना वेळेवर पैसे देण्याची मागणी होत आहे. तसेच किसान कार्ड नूतनीकरण अथवा नवीन कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.