लग्न लावून देणाऱ्या गुरुजींना दक्षिणेपोटी मिळाली तब्बल एवढी रक्कम…
पुणे – बदलत्या काळानुसार व्हिडिओ कॉन्फरन्स वा व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाइन लग्न लागण्याचा ट्रेंड रुढ होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ऑनलाइन लग्न मोठ्या शहरांसह लहान गावातील लोकांनाही आवडू लागली आहेत.असेच एक लग्न पुण्याची मुलगी आणि अमेरिकेत राहणाऱ्या मुलाचे झाले. हे लग्न लावून देणाऱ्या गुरुजींना दक्षिणेपोटी तब्बल १५०० यूएस डॉलर अर्थात भारतीय चलनानुनसार ४ लाख २० हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे हे ऑनलाइन लग्न सध्या चांगलेच गाजत आहे.
सिवनी येथील सुनील उपाध्याय यांचा मुलगा देवांश उपाध्याय हा अमेरिकेत नोकरी करतो. परदेशात त्याची ओळख पुण्यात राहणाऱ्या सुप्रियाशी झाली. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु कामातून वेळ मिळत नसल्याने दोघांना भारतात येऊन लग्न करणे कठीण होते. यावेळी देवांशने सिवनीतील त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली.मुलांची अडचण पाहता घरच्यांनी सिवनीतील ६७ वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्याशी बोलून विवाह मुहूर्त काढला. तारीख ठरली, त्यानंतर पंडित पांडे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून दोघांचे लग्न करण्याचे सांगितले. त्यानंतर उपाध्याय कुटुंब अमेरिकेला पोहचले. त्याठिकाणी लग्नाची सर्व तयारी सुरू झाली. लग्नाच्या दिवशी सिवनीत बसलेले पुजारी राजेंद्र पांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर २१ मे रोजी पंडित राजेंद्र पांडे यांनी देवांश आणि सुप्रियाचा ऑनलाइन विवाह हिंदू पद्धतीने संपन्न केला.