रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते…..! सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष….!
अमळनेर : शहरातील पिंपळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून राज्याचे विरोधी पक्ष नेते व व्हीआयपी नेते या रस्त्यावरून जाणार असल्याने तातडीने दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा काही घटना घडल्यास आपली जबाबदारी राहील असे पत्र मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याची देखभाल दुरुस्तीची छत्तीस महिन्यांची मुदत संपण्यापूर्वीच ठेकेदाराला अंतिम बिल अदा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील पिंपळे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत २०२०-२१ मध्ये करण्यात आला असून कामाची गुणवत्ता नसल्याने त्यावर अनेकदा खड्डे पडले आहेत. कामाचा पूर्णत्वाचा दाखला दिल्यानन्तर ठेकेदाराने ३६ महिने म्हणजे तीन वर्षे रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची अट ठेकेदाराला कार्यरंभ आदेशातच घालून देण्यात आली आहे. मात्र ठेकेदार रस्त्याची देखभाल दुरुस्ती करत नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभाग देखील रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. देखभाल दुरुस्ती नंतरच ठेकेदाराचे अंतिम बिल अदा करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने जुलै २२ मध्येच अंतिम बिल अदा करून दिले असल्याने रस्त्याची दुर्दशा होऊनही ठेकेदार ढुंकायला तयार नाही. काही नागरिकांनी बांधकाम खात्याकडे तक्रार केल्यानंतर विभागाने सुरुवातीला हा रस्ता आमच्याकडे नाही असे उत्तर दिले नंतर ठेकेदाराची देखभाल दुरुस्तीची मुदत दोनच वर्षे होती अशी उत्तरे देऊन ठेकेदाराची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. नगरपालीकेला ही तशीच तोंडी उत्तरे देण्यात आली होती. मात्र कागदपत्रे पाहिली असता देखभाल दुरुस्तीची मुदत ३६ महिने असल्याने मुदत शिल्लक आहे. शहरात १६ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार , विरोधी पक्ष नेते अजित पवार , जयंत पाटील यांच्यासह विविध व्हीआयपी व्यक्ती येत असून ते पिंपळे रोड मार्गे कार्यकर्त्यांकडे जाणार असल्याने रस्ता दुरुस्तीचे पत्र मुख्याधिकारी सार्वजनिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.