एरंडोलचे नागदेवता मंदीर बांधून मिळावे अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषणचा इशारा..
अंजनी नदीकाठी पुरातन मंदीर पुलाचे बांधकामप्रसंगी पूर्वसुचना न देता तोडले.
एरंडोल प्रतिनिधी – येथील अंजनी नदीकाठी पुरातन नागदेवताचे मंदीर पूर्ववत बांधून मिळावे अन्यथा १५ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषणाचा इशारा मदनलाल दामोदर भावसार (रा. गांधीपुरा एरंडोल) यांनी न.पा. प्रशासकांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती अशी की, गांधीपुरा भागातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी कै. दामोदर वामन भावसार (२२ वर्ष नगरसेवक राहिलेले) यांनी जनतेसाठी रंगारी परिसरात नागदेवताचे मंदीर उभारले होते. परंतू गांधीपुरा भागातील नागरीकांच्या सोईसाठी रंगारी पुलाचे बांधकामप्रसंगी सदर मंदीर तोडण्यात आले. याठिकाणी कोणतीही पूर्वसुचना दिलेली नाही. (फक्त मंदीर उभारून मिळेल असे तोंडी आश्वासन दिले होते असे समजले) सध्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने सदर मंदीराचे बांधकाम करून द्यावे अशी अपेक्षा भावसार यांनी व्यक्त केली आहे.
पुढील महिन्यात येणार्या नागपंचमी (श्रावण शु॥ पंचमी) असल्याने अनेक महिला, भगिनींसह नागरीक मंदीरात पुजा-अर्चा करण्यासाठी येतात. तरी नपा प्रशासनाने अथवा संबंधित ठेकेदाराने त्वरीत दखल घ्यावी अशी अपेक्षा केली आहे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा मदनलाल भावसार यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांत, तहसिलदार, पोलिस स्टेशन यांना दिल्या आहेत.