पशुवैद्यकीय कर्मचारी निवासस्थान कर्मचाऱ्या अभावी ओसाड
प्रतिनिधी एरंडोल – येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून सुसज्ज निवासस्थान बांधलेले असून यात सुमारे बारा वर्षापासून कोणीही कर्मचारी राहत नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी एरंडोल पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ कर्मचाऱ्यांसाठी निवास्थान बांधकाम करण्यासाठी रक्कम रुपये ११.१७ लाख व ११.९५ लाख तसेच ६.०४ लाख किमतीची निविदा काढली होती तसेच सदर बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करून द्यावे अशी अट टाकली होती त्यानुसार सदर कामाचा दोष निवारणासाठी काम संपल्यापासून बारा महिने राहील अशी अट टाकली होती. त्यानुसार शासनातर्फे सदर बांधकामाला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी ११.१७ लक्ष , परिचर निवासस्थानासाठी ११.९५ लक्ष तसेच पशुवैद्यकीय दवाखाना संरक्षण भिंति साठी ६.०४ लक्ष रुपये सदर विभागाला मिळाले आहेत. एकूण २९.१६ लाख रुपये निधी मंजूर होऊन शासनाने केलेल्या लाखो रुपयांच्या बांधकामाच्या ठिकाणी आज पावेतो एकही कर्मचारी निवासस्थानी राहत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच संरक्षण भिंतीचे काम सुद्धा अपूर्ण असून त्यासाठी पूर्ण निधी मिळालेला आहे. सदर वास्तू अनेक वर्षापासून रिकामी असल्याने तसेच संरक्षण भिंतीच काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी अवैद्य प्रकार घडत असतात तसेच सदर वास्तू ओसाड पडलेली असून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान सदर विभागाकडून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकाकडून होत आहे. दरम्यान बहुसंख्य अधिकारी , कर्मचारी बाहेरगावाहून ये जा करीत असतात. त्यामुळे तालुक्यातील आसपासच्या ग्रामीण भागातून रात्री अपरात्री पशु मालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळेस उपचारा अभावी मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे तरी वरिष्ठांनी या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.