जिल्हाधिकारी कार्यालयाचं रूप पालटणार….

images-9.jpeg

प्रतिनिधी – जळगाव(जिमाका) जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही हेरीटेज स्वरुपाची आहे. या इमारतीच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी खर्च करण्यास पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तत्वतः मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी इमारतीचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. याबाबतचे आदेश आज पारित करण्यात आले आहेत.


जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी खेडे गावामधून तसेच इतर जिल्ह्यातून सुद्धा नागरिक व अभ्यागत मोठ्या प्रमाणात येत असतात. या अभ्यागत व नागरिकांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आदी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कार्यालयात दैनंदिन मुलभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या नूतनीकरण व सुशोभीकरण समितीमध्ये सदस्य म्हणून भूमी अभिलेख जिल्हा अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी कार्यालय महसूल तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम (विद्युत उपविभाग, जळगाव) उपअभियंता, जिल्हाधिकारी कार्यालयाचे राजशिष्टाचार शाखेचे नायब तहसिलदार, आस्थापना शाखा अव्वल कारकून योगेश पाटील, हिशोब शाखा अव्वल कारकून ए. पी. कुलकर्णी, विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालय अव्वल कारकून श्रीमती. रेखा चंदनकर, महसूल सहायक सिद्धांत बडगे, वाहनचालक संदीप पाटील, व शिपाई सुरेश महाले यांचा समावेश आहे. तर या समितीचे सदस्य सचिव म्हणून सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार काम पाहतील.

या समितीवर विशेष निमंत्रित व मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व परिविक्षाधीन आयएएस अर्पित चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे.

इमारतीचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम किमान दरामध्ये, गुणवत्तापूर्ण होईल याकडे समितीने लक्ष द्यावे. २०२३ – २४ आर्थिक वर्षात काम पूर्ण होईल. याबाबत नियोजन व नियंत्रण करावे.‌ समिती कामकाज पूर्ण होईपावेतो कार्यरत राहील. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.‌

About Author

You may have missed

error: Content is protected !!