एरंडोल येथे जल्लोषात ‘श्रीं, ची स्थापना..!
एरंडोल: येथे मंगळवारी १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी व लहान-मोठ्या सुमारे ७० ते ८० खाजगी गणेश मंडळांनी सवाद्य मिरवणूका काढून जल्लोषात श्रीं ची स्थापना केली. शहरातील सार्वजनिक मंडळांनी मेनरोड पासून वाजगाजत मिरवणूका काढून जल्लोषात आपल्या गणेशमूर्ती ची स्थापना केली. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ट्रॅक्टर वर ठेवलेल्या मूर्तीसमोर ढोल ताशांच्या गजरात थिरकत होतें.
यावेळी गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. शहरात सर्वत्र गल्लीबोळात देखील बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण आलेले दिसून येत आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जयगुरू व्यायाम शाळा, सावता माळी गणेश मंडळ,नागराज मित्र मंडळ,जयहिंद गणेश मंडळ, सर्वोदय मित्र मंडळ,माहेश्र्वरी नवयुवक मित्र,श्रीराम मित्र मंडळ, बालवीर मित्र मंडळ आदी मंडळांनी गणेशोस्तवात सहभाग नोंदवला आहे.
१० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून मनोरंजनाचे कार्यक्रम,जनजागृतीपर कार्यक्रम,प्रबोधनात्मक कार्यक्रम, जातीय सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत होणारे,रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मंडळे आपल्या गणेशमूर्ती सोबत मनोहारी आरास उभारून प्रमुख सामजिक समस्यांवर प्रकाशझोत टाकला जातो.
विशेष हे की, १० दिवसीय सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची १०० वर्षांपेक्षा अधिक मोठी परंपरा एरंडोल शहराला लाभली आहे. या संस्कृत ठेव्याचे जतन करण्यासाठी सर्व मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नांची शिकस्त करतात.
पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.