एरंडोल तालुक्यात दोन जिल्हा मार्गासह ७५ ग्रामीण रस्ते…
जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता वाय. एन. थोरात यांची माहिती
प्रतिनिधी एरंडोल:-तालुक्यात ११६ किलोमीटर लांबीचे दोन इतर जिल्हा मार्ग असून २६३ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते असल्याची माहिती येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता वाय एन थोरात यांनी दिली आहे.
एरंडोल विखरण रिंगणगाव कढोली वैजनाथ टाकरखेडा बांभोरी या जिल्हा मार्गाची लांबी ८३.२० किलोमीटर असून त्यापैकी साडेबावीस किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालेले आहे मात्र अजूनही उर्वरित मार्गाचे डांबरीकरणाचे काम कधी होणार याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. नागदुली, वाघळूद सीम, ताडे बामणे आनंद नगर तांडा तळई आडगाव अंजनी विहिरे, वरखेडी हा जिल्हा मार्ग ३३ किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी १२ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे तर १० किलोमीटर रस्त्याचे खडीकरण झाले आहे. विशेष दुर्दैवाची बाब अशी की अजूनही ११ किलोमीटर रस्ता माती मुरमाचा आहे या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण लवकर होणे गरजेचे आहे
एरंडोल तालुक्यात ७५ ग्रामीण रस्ते आहेत या रस्त्यांची लांबी २६३.९० किलोमीटर आहे. त्यात ७३.२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. १०४.६ किलोमीटर रस्त्याचे खडीकरण झाले आहे मात्र अजूनही ७७.१० किलोमीटर ग्रामीण रस्ते माती मुरुमाचे आहेत.
एका बाजूला आपल्या देशाने चांद्र भूमी गाठली तर दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या कायम आहे वास्तविक ग्रामीण भागातील सर्व रस्ते पक्के झाले व त्यांचे डांबरीकरण झाले तर ग्रामीण भागात प्रगतीला अधिक गती मिळू शकते . सत्तेसाठी किंवा सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी नीतिमत्ता व पक्षाचे विचारसरणी बाजूला ठेवून कशीही व कोणतीही आघाडी व युती करणाऱ्या राजकीय नेत्यांनी ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आघाडी किंवा युती का करू नये असा संतप्त सवाल उपस्थित केला जातो.