एरंडोल पोलिसांचे कौतुकास्पद कार्य सात दिवसात चोरीचा तपास करुन आरोपींच्या आवळल्या मुस्क्या.
चोरट्यांकडून मुद्देमाल केला हस्तगत.
प्रतिनिधी – एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही दिवसात शहरातील कागझीपूरा भागातील बंद असलेल्या घरातून चोरी झालेल्या तब्बल अडीच लाख रुपये रोख व ४३ ग्राम सोने चोरून नेलेल्या चोरट्यांच्या मुद्देमाला सह मुस्क्या आवळल्या आहेत.
याबाबत एरंडोल पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , कागजीपूरा भागातील खालीद अहमद रफिक अहमद हे दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत दोन दिवस अमरावती येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नाकरिता गेले असता १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.०० वा. ते परत आले.त्यांना घरातील २ लाख ३८ हजार ६४२ रुपये किमतीचे ४३ ग्राम सोन्याचे दागिने व २ लाख ५० हजार रोख रक्कम असे एकूण ४ लाख ८८ हजार ६४२ रुपयांचा ऐवज घरातून लांबविला.यात चोरांनी घराच्या मागील दाराला छिद्र पाडून अलगद दरवाजा उघडून घरात प्रवेश करून ऐवज लांबविला.दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे तपास करीत असताना घटनास्थळावरील परिस्थिती वरुन फिर्यादी यांचे जवळील व माहितगार यांनी केला असल्याची शक्यता दिसून येत असल्याने कागझीपूरा येथे राहणारे फिर्यादी यांचे जवळील आझाद शेख शब्बीर चौधरी ( वय २३ वर्षे ) धंदा चालक , मेहंदी रजा शेख अली अहमद ( वय ३५ वर्षे ) धंदा कारपेंटर,कलीम शेख रहीम ( वय ३७ वर्षे ) धंदा फिटर सर्व रा.कागझीपूरा यांच्यावर संशय आल्याने त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह कलीम शेख यांचा सासरा आसिफ रा.मालेगाव असे एकूण चार जणांनी चोरी केली असल्याचे कबूल केले असून चौथा आरोपी आशीफ हा फरार आहे तसेच फिर्यादी खालिद रफीक शेख यांच्या घरातील दिवान व कपाटातील ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन लाख पन्नास हजार रुपये चोरून नेल्याचे कबूल केले. त्यात आरोपींकडून ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये चोरांनी चोरी करताना फिर्यादीच्या घरातील दुसऱ्या कोणत्याही वस्तू अस्तव्यस्त न केल्याने चोरी ही जवळच्या व्यक्तीने केली असल्याचा संशय बळावला असल्याचे सांगितले व त्यातूनच पोलिसांना खरे आरोपी शोधून काढण्यात यश मिळाले. सदर कारवाईत सहभागी पो.हे. काॅ. अनिल पाटील , सुनील लोहार, विलास पाटील , जुबेर खाटीक , पोलीस नाईक अकील मुजावर , पोलीस शिपाई प्रशांत पाटील , पंकज पाटील, पोलीस चालक हेमंत घोंगडे गृह रक्षक दलाचे दिनेश पाटील आदींनी तपासात अनमोल सहकार्य केले.
संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून फरार आरोपी आशीफ याचा शोध घेणे सुरू आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनच्या ह्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.