राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडे याने १०७ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले
अमळनेर : खेलो इंडियाच्या दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडे याने १०७ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे. त्याच्या यशाने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
क्रिकेट खेळाडू हरभजनसिंग व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दिनेशला कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. दिनेशने १४८ किलो वजन उचलले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत विविध गटातील ३५० स्पर्धक सहभागी झाले. महाराष्ट्रातून दिनेशची एकट्याची निवड झाली होती. दिनेश बागडे याने अपघातात आपला पाय गमावला होता. मात्र त्याने अपयशाने खचून न जाता त्याने पॉवर लिफ्टिंग क्षेत्रात स्वताला झोकून यश संपादन केले आहे. त्याला बालेवाडीचे अरुण पाटील , सारिका सरनाईक ,रविभूषण कुंटेकर ,राकेश पाटील, अमळनेरचे किशोर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. अमळनेर तालुक्यात सर्वत्र दिनेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.