जयहिंद कॉलेज,धुळे येथे विद्यार्थ्यांना पत्रकारिता विषयक मार्गदर्शन
प्रतिनिधी (धुळे) जयहिंद कॉलेज,धुळे येथे आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त झेप मराठीचे प्रमुख संपादक प्रा.अनिल चव्हाण सर आणि दै.दिव्य मराठी, धुळे विभाग संपादक मा.श्री.अमोल पाटील सर यांचे पत्रकारिता भविष्यातील आव्हाने व सामाजिक बांधिलकी या विषयावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक अंतर्गत डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सर्वप्रथम प्रा.मोहन मोरे सरांनी व विद्यार्थ्यांनी प्रास्ताविकात आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती सादर केली.तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा कार्य परिचय करून दिला.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार मित्र दै.दिव्य मराठी चे संपादक श्री.अमोल पाटील सर ,झेप मराठीचे प्रमुख संपादक प्रा.अनिल चव्हाण सर, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम चे मार्गदर्शक प्रा.मोहन मोरे सर यांचा पत्रकार दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भावी पत्रकारांना मार्गदर्शन करताना श्री.अमोल पाटील म्हणाले की पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत आहेत त्यामुळे पत्रकारांनी नेहमी अपडेट राहणं गरजेचे आहे.पत्रकारिता हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक साधन आहे.पत्रकार हा संपूर्ण समाजाच्या सुख दुःखाशी जोडला जातो.बातमी देताना खरे खोटेपणा पडताळून पाहिला पाहिजे.समाजाचा विश्वास हीच पत्रकाराची सर्वात मोठी ताकद असते.आदर्श पत्रकाराचे लेखन,संभाषण आणि प्रबोधन हे तीन गुण महत्वाचे असतात ज्यावर त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते!”
त्यानंतर झेप मराठीचे प्रमुख संपादक प्रा.अनिल चव्हाण सर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की काळ आणि समाज बदलतो आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीत पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आ वासून उभे आहेत.पत्रकारांवर होणारे हल्ले पत्रकारितेला खूप घातक आहेत.घटनेच्या खोलात जाऊन दोन्ही बाजूने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता करणे गरजेचे आहे.पत्रकाराने सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या वेदना वृत्तपत्रात मांडल्या पाहिजेत.पत्रकारांनी समाजाशी समरस होऊन त्यांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे.एक आदर्श पत्रकार हा माणसं जोडतो आणि समाजाला योग्य दिशेने पुढे नेतो!”
तसेच या प्रसंगी डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम च्या भावी पत्रकार विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पत्रकारिता क्षेत्राशी संबंधीत समस्या व प्रश्न मान्यवरांना विचारून आपल्या शंकाचे निराकरण केले.
शेवटी विद्यार्थ्यांनी बहुमोल अशा मार्गदर्शनाबद्दल उपस्थित मार्गदर्शक मान्यवरांचे आभार मानले.