अमळनेर येथील युवकांचे स्वतःला जमिनीत गाडून केले अनोखे आंदोलन.
विशेष प्रतिनिधी :- अमळनेर शेडनेट घोटाळ्याची ठोस चौकशी होत नसल्यामुळे चार युवकांनी दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाबाहेर स्वतःला जमिनीत गाडून घेत अनोखे आंदोलन केले या शेडनेट घोटाळ्यातील दोषींवर दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडून मिळाल्याने तब्बल तीन तासांनी सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
अमळनेर, पारोळा, तालुक्यात शेडनेट मध्ये घोटाळा झाला. यातील दलालांनी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत न पोहचविता परस्पर कोट्यावधीची रक्कम हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर अध्यक्ष सचिन बाळू पाटील, शिवसेनेचे अनंत निकम, ईश्वर पाटील, कैलास पाटील, नारायण पाटील, यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला होता. त्यानुसार ठोस कारवाई न झाल्यास आम्ही स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सचिन पाटील, अनंत निकम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी २६ रोजी सकाळी स्वतःला मातीत गाडून घेतले होते. सदर प्रकरणी दोन आठवड्यात ठोस कारवाई होईल काय ? यांकडे अमळनेरसह पारोळा तालुक्याचे लक्ष लागून आहे.