पोर देखाले गया, लगीन करी उना धमाल कॉमेडी अहिराणी चित्रपट झाला रिलीज
प्रतिनिधी – एरंडोलचे प्रशांत शिंदे यांचे पहिले यशस्वी पाऊल-खान्देशी दिलवाला प्रॉडक्शनची निर्मिती
एरंडोल – सध्या प्रत्येक समाजात विवाह जमणे खूपच कठीण झाल्याने उपवर मुलांची संख्या वाढली आहे. त्यातच मुलींच्या वाढत्या अपेक्षा (अनावश्यक) यामुळे तर विवाह जुळणे गावोगावी कठीण झाले आहे. विवाहांमधील वाढता खर्च, जेवणावळ, वाजंत्री, डी. जे., मानपान यामुळे कर्जाचा डोंगर वाढतो आहे. या आणि अशा ज्वलंत समस्यांचा विचार करूनच एरंडोलचे युवा प्रशांत शिंदे (रोटवदकर) आणि सहकार्यांनी अहिराणी चित्रपट काढण्याचा विचार करून अंमलात आणला देखील. अर्थात नवोदीत कलाकार देखील तयार झाले. बघता बघता चित्रपट पूर्ण देखील झाला आणि आश्चर्य म्हणजे सोशल मीडिया, यू-ट्यूबवर धम्मालच धम्माल सुरू आहे.
ग्रामीण भागातील म्हणजेच खेडे गावातील शेतकरी कुटूंबातील कथा असून नायक-नायिका ग्रामीण भागातीलच आहे. चित्रपटाचे चित्रीकरण रोटवद ता. धरणगांवसह धरणगांव, एरंडोल परिसरात करण्यात आले आहे. धुळे, जळगांव, नंदूरबार, नाशिक परिसरात अहिराणी सर्वत्र बोलली जात असल्याने अनेकांना कथानक आवडल्याचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक प्रशांत शिंदे यांनी सांगितले.
माजी जि. प. उपाध्यक्ष रोटवदचे बापूसाहेब जानकीराम पाटील, पोलिस पाटील नरेंद्र शिंदे, सरपंच सुदर्शन पाटील यांचेसह सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, योगेश शिंदे, सागर शिंदे, शुभम शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच मोठे बंधू डॉ. प्रदीप शिंदे यांचे मार्गदर्शन आणि पाठींब्यामुळे तसेच शिंदे परिवाराचे सहकार्य लाभल्याचे प्रशांत शिंदेंनी सांगितले.
कलाकार चित्रपटासाठी अवधुत चौधरी, गीता चौधरी, भावेश शिंपी, गणेश पाटील, अस्मिता पाटील, महेश अहिरे, दिपक पाटील, सिध्देश वाघ, प्रतिक कुंभार, विवेक नेरपगार, मनिष पाटील आदींचे सहकार्य लाभले आहे.