जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषद मध्ये पत्रकारांचा हिरमोड.
प्रतिनिधी – एरंडोल येथे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असता त्यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले तसेच पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे न देता पत्रकारांचा हिरमोड केला.
एरंडोल येथील नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच मतदान केंद्रनिहाय माहिती जाणून घेतली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये काही नवीन बदल करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे निरसन केले.
आढावा बैठकीस तहसीलदार सुचिता चव्हाण , गटविकास अधिकारी दादाजी जाधव , नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार , पोलीस निरीक्षक सतीश गोराडे , नायब तहसीलदार दिलीप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
यानंतर एरंडोल नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणुकीची तयारी जवळपास झाली असुन त्याचे नियोजन ही शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले. यावेळी अचूक निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे तसेच आढावा मुक्त निवडणूक घेतली जाणार असल्याचे सांगितले. यानंतर निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक कारवाई करून मतदाराला निडरपणे मतदान करता येईल असे सांगितले तसेच आचारसंहिते वेळी सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणार असल्याचे सांगितले. मतदान प्रक्रियेत अनेक सुविधा पुरवल्या जाणार असल्याचेही सांगितले यातील महत्वपूर्ण एकुण ११ मतदान केंद्रांवर ५ मॉडेल मतदान केंद्र , ज्या ठिकाणी मुलींचे जन्मदर कमी असेल असे ३ महिला व मुलीं करिता मतदान केंद्र ,२ दिव्यांग मतदान केंद्र व १ युवा मतदान केंद्र असणार असल्याचे सांगितले तसेच मॉडेल मतदान केंद्रावर ड्रेस कोड असल्याचे सांगितले. वैशिष्ट्य पूर्ण बाब म्हणजे काही मतदान केंद्रावर थीम असणार असल्याचे सांगितले. शेवटी एरंडोल महसूल विभागाबद्दल कौतुकास्पद उद्गगार काढले. तसेच स्वतः जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात एकूण ८ प्रकारे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाळू माफियांतर्फे मारहाण झाल्या प्रकरणी खंत व्यक्त केली तसेच लवकरात लवकर या लोकांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले. यानंतर एरंडोल नगरपालिकेच्या वसुली संदर्भात बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चांगल्या नगरपालिका प्रकारात मोडत असल्याचे सांगून दरवर्षी सदर नगरपालिका ९०% च्या वर कर वसुली करत असल्याचे सांगितले व कौतुक केले यावेळी पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना सदर नगरपालिका जास्तीत जास्त करवसुली करत असून देखील शहरातील नवीन वसाहती व काही ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरपालिका अपयशी का ठरत असल्याचे विचारले. तसेच ज्येष्ठ पत्रकारांनी मतदान प्रक्रियेविषयी विचारलेले प्रश्न यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी समर्पक उत्तर न देता या प्रश्नाला बगल दिल्याने पत्रकारांचा हिरमोड झाला.