शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयाबाहेरच आमरण उपोषण
२०२१ मधील अतिवृष्टीचा मोबदला मिळेना…
अमळनेर(प्रतिनिधी)
:- २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बहुतांश शेतीपिकांचे नुकसान झालेले असूनही कुठलीही शासकीय मदत मिळाली नसल्याने अखेर पीडित शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाबाहेरच आमरण उपोषणाला सुरवात केलेली आहे.
तालुक्यातील अनेक भागात २०२१ मधील खरीप हंगामात अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे ३३% च्या वर नुकसान झाले होते.तब्बल २७ महिने उलटून देखील शासनाकडून कुठलीही दखल घेतली न गेल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला,मंत्री महोदयांना,संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी पुराव्यानिशी निवेदन दिले असून याआधी शेतकरी साखळी उपोषणाला देखील बसले होते.मात्र शासनाकडून आश्वासनांशिवाय काहीच पदरी पडले नसल्यामुळे आमरण उपोषणाला बसत असल्याचे शेतकरी नेते शिवाजी पाटील यांनी सांगितले.
शेतकरी दिलीप बाबुराव पाटील व मधुकर कौतीक पाटील हे शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
ऐनवेळी उपोषणाचे ठिकाण बदलले.
१५ दिवसात मोबदला न मिळाल्यास ना.अनिल पाटील यांच्या घरासमोर आमरण उपोषणाला बसण्याचे पत्र २५ जानेवारी रोजीच शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले होते.मात्र पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्तीने ना.अनिल पाटील यांच्या घरासमोर होणारे उपोषण अखेर प्रांत कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी सुरू केले.