एरंडोलला नियोजनाअभावी हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची वणवण-हंडामोर्चा निघणार ?
एरंडोल (प्रतिनिधी) – धरण उशाला अन् कोरड घशाला या म्हणीनुसार एरंडोलकरांना आठवड्यातून फक्त एकदाच नपातर्फे पाणीपुरवठा केला जात आहे. याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून केवळ नियोजनाअभावी नागरीकांची पाण्यासाठी (हंडाभर) वणवण सुरू असून एप्रिल-मे-जूनचे काय ? असा सवाल केला जात आहे. त्यामुळे महिलांसह नागरीकांचा हंडा मोर्चाची तयारी गांधीपुरा भागातील नागरीकांची सुरू असल्याची माहिती माजी नगरसेवक सुभाष नाना मराठे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
मागील 15 दिवसांपूर्वी एरंडोल नपास महिलांसह नागरीकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होेते. परंतू कसले काय ? शहरातच काही भागात 5/6 दिवसांतून पाणी पुरवठा होतो मात्र गांधीपुर्यात 7/8 तर कधी 8/9 दिवसांत पाणी पुरवठा केला जातो हा भेदभाव तरी का ? असाही सवाल केला जात आहे. राज्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असली तरी अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील 8/10 दिवसात पाणीपुरवठा कशासाठी ?
विशेष खेदाची बाब म्हणजे पाणी केव्हा सोडणार ? याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे कामधंदा सोडून घरातील एका व्यक्तीला रोजंदारी सोडून घरीच थांबावे लागते. याबाबतीत मजेशिर आणि गमतीदार उत्तर नपाकडून दिले जाते ते असे की आम्ही 10/15 मिनीटे पाणीपुरवठा जास्त करतो आत्ता बोला… अहो आठ दिवस पाणी साठविण्यासाठी तेवढे भांडे, टाकी तरी असावी ना ? नपाने पाणीपुरवठा सुरळीत करावा हीच अपेक्षा सुभाष नाना मराठे आणि नागरकांनी केली आहे.