भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच पालघर जिल्ह्याचे ऑनलाईन काव्यसंमेलन उत्साहात संपन्न.
विशेष प्रतिनिधी :-पालघर येथे भारतीय साहित्य आणि सांस्कृतिक मंच यांच्यातर्फे जिल्ह्याचे प्रथम ऑनलाईन काव्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. पालघर जिल्हा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या “त्यागाची मूर्ती” या विषयांतर्गत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यानिमित्त हे ऑनलाईन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. “आयोजिका पालघर जिल्हाध्यक्षा मा. यशस्वी पाटील” यांनी गणेश पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यामुळे छान व प्रसन्न वातावरण निर्मिती झाली. त्यानंतर सातारा जिल्हाध्यक्षा मा. सुवर्णा पाटुकले यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वागतगीत गाऊन , सर्व उपस्थित मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे व निमंत्रित कवी वृदांचे सुंदर प्रकारे स्वागत केले. सर्व उपस्थितांनी अगदी मंत्रमुग्ध होऊन स्वागतगीताचे श्रवण केले व उस्फूर्तपणे दादही दिली.
पालघर समूहाच्या ह्या पहिल्याच ऑनलाईन काव्य संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मुंबई व कोकण विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षा मा. वैशाली पडवळ मॅडम म्हणजेच एंजल वैशू यांनी केले. सर्वांचे हसतमुखाने स्वागत करून , मन वेधून घेणाऱ्या हृदयस्पर्शी बोलाने त्यांनी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. प्रत्येक कवीच्या कविता सादरीकरणानंतर प्रत्येकालाच खूप छान काव्यात्मक व प्रेरणादायक अभिप्राय देत त्यांनी प्रत्येक कवी/कवयित्रींचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. विशेष लक्ष वेधले गेले ते यामुळे , की त्यांनी निमंत्रित कवींची फक्त कविता न ऐकता, प्रत्येकाला आपले मंचाबाबतचे व पालघर समूहाबाबतचे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. यामुळे सर्वच कवी/कवयित्रींनी अगदी उत्साहाने आपले काव्य सादरीकरण केले तसेच मंचाबद्दलच्या आपल्या भावनाही हृदयस्पर्शी शब्दांत मांडल्या.
“काव्यासह मनोगत”ही पद्धत पहिल्यांदाच भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या काव्यसंमेलनात सूत्रसंचालिका वैशाली यांनी वापरली होती. फक्त पालघर समूहाच्याच नाही तर संस्थेच्या इतर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही व्यवस्थित प्रकारे मानसन्मान देऊन काव्य सादरीकरण व मनोगत व्यक्त करण्याची सुवर्णसंधी मा. वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) यांनी उपलब्ध करून दिली. यामुळे एकूणच हे काव्यसंमेलन सुरू होताना जरी पालघरचे असले तरीही ते फक्त पालघर समूहापुरते मर्यादित न राहता जणू संपूर्ण भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचेच ऑनलाईन काव्यसंमेलन असल्याचा भास सर्व उपस्थितांना झाला.
कोकण प्रदेश उपाध्यक्ष मा. सिद्धार्थ सुर्वे सर यांच्या बहारदार प्रेमकाव्याने ह्या ऑनलाईन काव्यमैफिलीची सुंदर सुरुवात झाली. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षा मा. छायाताई देसले यांनीही सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपली उपस्थिती दर्शविली व आपल्या गोड आवाजात, शेतकऱ्यांच्या जीवनाशी व पावसाशी संबंधित असलेली एक हृदयस्पर्शी कविता सादर करून सर्वांना भारावून टाकले.मंचाबद्दल , संमेलनाबद्दल , यशस्वी ताईंच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना प्रदेश कार्याध्यक्षा वैशाली पडवळ ( एंजल वैशू )यांच्या कार्याचे व प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ सुर्वे यांच्या कार्याचे कौतुक करायलाही त्या विसरल्या नाहीत.
सहभागी सर्वच निमंत्रित कवी म्हणजेच मुंबई प्रदेश जिल्हाध्यक्ष व कोकण प्रदेश उपाध्यक्ष मा. सिद्धार्थ सुर्वे सर यांच्यासह कवयित्री मा. ऋचाताई पत्की , मा. मालिनीताई सवडदकर , मा. सुवर्णाताई पाटुकले , कवी मा. सुजित कुपटे सर, मा. मच्छिंद्र झुरंगे सर , मा. ज्ञानदेव डिघुळे सर ,मा. जितेन्द्र गोखले सर , मा. नागेश बोंतेवाड सर , मा. महादेव भोकरे सर, मा. मोहन वाकचौरे सर या सर्वांनीच सुंदर सुंदर रचना सादर करून एक रंगतदार काव्यमैफिल सजवली. पालघर समूहाबद्दल, प्रदेश कार्याध्यक्षा मा.वैशाली पडवळ म्हणजेच एंजल वैशू आणि पालघर जिल्हाध्यक्षा मा. यशस्वी पाटील यांच्याबद्दल सर्वांनीच गोड शब्दांमध्ये त्यांच्या कार्याचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले. निमंत्रित कवी मा. श्री. महादेव भोकरे यांनी सूत्रसंचालिका , प्रदेश कार्याध्यक्षा वैशाली ताईंच्या समयसूचकतेचेही विशेष कौतुक केले.
या बहारदार काव्यमैफिलीला मंचाच्या पालघर महिलाध्यक्षा मा. वाणी केरकलमट्टी, मुख्य समूह तसेच अहमदनगर व जळगाव प्रशासिका मा. ऍड. अक्षशिला शिंदे, नागपूर जिल्हाध्यक्षा मा. संध्याताई लायस्कर, ठाणे जिल्हाध्यक्षा मा. अंजुमताई शेख, सातारा जिल्हाध्यक्षा मा. सुवर्णाताई पाटुकले यांनी आपले काव्य व मनोगत सादर केले. उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. सचिन राजपूत सर , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा. पांडुरंग आलीम सर , मुंबई प्रदेश विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष व अमरावती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. अविनाश ढळे सर यांनी सुद्धा अखेरपर्यंत उपस्थिती नोंदवली.
या सुंदर कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष पद अनेक पुरस्कार प्राप्त कवी, एक उत्तम लेखक व संपादक मा. वैभव धर्माधिकारी सर यांनी भूषविले. उपस्थित कवींना खूप सुंदर प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले आणि यासोबतच सुंदर अशी गझल व कविता त्यांनी सादर केली , जी सर्वच कवींच्या मनाला स्पर्शून गेली. सर्व कवींना भरभरून शुभेच्छा देत त्यांनी पालघर समूहातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर केला व प्रेरणादायक शब्दांत विजेत्यांचे अभिनंदनही केले.
कार्यक्रमाला “प्रमुख अतिथी” म्हणून लाभलेले संस्थेचे “संस्थापक अध्यक्ष सन्मा. विशाल सिरसट सर” यांनीही सुंदर शब्दांत आपले मनोगत मांडले. यामधे त्यांनी पालघर जिल्हा समूहाच्या कार्याबद्दल गौरवोउद्गार काढले आणि या काव्यसंमेलनात प्रदेश कार्याध्यक्षा मा. वैशाली पडवळ( एंजल वैशू ) यांच्यातर्फे प्रथमच वापरल्या गेलेल्या “काव्यासोबत मनोगत” या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुकही केले. ऍड. अक्षशिला शिंदे यांच्याही कार्याचे त्यांनी कौतुक केले. प्रदेश कार्याध्यक्षा मा. वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) यांच्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट कार्याची दखल त्यांनी घेतली तसेच पालघर जिल्हाध्यक्षा मा. यशस्वी पाटील यांच्याही साहित्यिक कार्याचे कौतुक करत त्यांनी दोघींच्याही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई व कोकण प्रदेशाध्यक्षा मा. वैशाली पडवळ मॅडम ह्या आणखी नवनवीन कल्पना राबवून यापुढेही पालघर समूहासाठी व भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचासाठी कार्य करतील याची ग्वाही देत उपस्थित साहित्यिकांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले.
यानंतर मुंबई व कोकण प्रदेश कार्याध्यक्षा मा. वैशाली पडवळ म्हणजेच एंजल वैशू यांनी “आरसा” ही आपली अष्टाक्षरी कविता सादर केली व सर्व उपस्थितांची दाद मिळवली. त्यांनी या “काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण” केले असल्याने त्याबद्दलही आपले मनोगत व्यक्त केले व सर्व कवी वृदांला मार्गदर्शन केले. ह्या सुंदर संमेलनाचे तितकेच सुंदर आभार प्रदर्शन या संमेलनाच्या आयोजिका पालघर जिल्हाध्यक्षा मा. यशस्वी पाटील यांनी उत्कृष्ट प्रकारे केले. प्रदेश कार्याध्यक्षा मा.वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) यांनीही सुंदर शब्दांत सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून या सोहळ्याची सांगता केली.
दिड तासाचा हा काव्यसोहळा तीन तासांहून अधिक लांबला. अशा रितीने भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या पालघर समूहाचे हे पहिलेच काव्यसंमेलन म्हणजेच जणू संपूर्ण मंचाचे हे ऑनलाईन काव्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला.