अंजनी नदीपात्राच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

InCollage_20240501_222904748.jpg

एरंडोल-सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी वर्षभर खळाळून वाहणा-या अंजनी नदीपात्राची स्वच्छतेअभावी गटारगंगा झाली असून नदीच्या पात्रात सर्वत्र हिरव्या वनस्पती वाढल्यामुळे पात्राचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. नदीच्या पात्राची स्वच्छता करण्याची जबाबदारी पाटबंधारे खात्याची आहे का नगरपालिकेची आहे याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहराचे वैभव असलेली अंजनी नदी सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी वर्षभर वाहत होती.नदीच्या पात्रात पाणी राहत असल्यामुळे नागरिक व लहान मुले पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. मात्र त्यानंतर पावसाच्या प्रमाणात घट झाल्यामुळे तसेच पळासदड (ता.एरंडोल) येथे अंजनी नदीवर अंजनी
प्रकल्प बांधण्यात आल्यामुळे नदीच्या पात्रात पावसाळ्याचे काही दिवस पाणी राहते उर्वरित काळात नदीचे पात्र कोरडे राहत असल्यामुळे पात्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वी नदीच्या पात्रात पोहण्याचा आनंद लुटणारे नागरिक नदीच्या पात्राची झालेली अवस्था पाहून सुन्न होत आहेत.सद्यस्थितीत पात्रात सर्वत्र हिरव्या रंगाच्या पाणेरी वनस्पती वाढल्या आहेत.पात्रात शहरातील सर्व सांडपाणी गटारींच्या माध्यमातून सोडले जात असल्यामुळे पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले असून सर्वत्र दुर्गंधी येत आहे.नदीपात्रात मोकाट कुत्रे आणि डुकरे यांचा
मुक्त संचार राहत असल्यामुळे तसेच नागरिकांकडून पात्राचा वापर प्रात:विधीसाठी केला जात असल्यामुळे पात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अंजनी प्रकल्पातून धरणगाव तालुक्यातील काही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते.नदीच्या पात्राची स्वच्छता
करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे की पाटबंधारे खात्याची आहे याचा खुलासा करण्याची गरज आहे. पालिकेतर्फे दरवर्षी अंजनी नदीच्या पात्राची पावसाळयापूर्वी स्वच्छता केली जाते मात्र त्यानंतर पात्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त
प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.पाच ते सहा वर्षांपूर्वी शहरातील उद्योजक,व्यावसायिक,सामाजिक कार्यकर्ते आणि नौकरदार नागरिकांनी एकत्र येवून स्वखर्चाने पात्राची स्वच्छता केली होती.अंजनी नदीवरील काळा बंधारा
ते महामार्गावरील नवा पूल अशा सुमारे तीन ते चार किलोमीटर नदीच्या पात्रात सर्वत्र हिरव्या वनस्पती वाढल्या असून पात्रातील वाळूचा उपसा करण्यात आल्यामुळे सर्वत्र खडक दिसत असल्यामुळे पात्राचे पूर्णपणे विद्रुपीकरण झाले आहे.नदीच्या पात्राच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून निधी
उपलब्ध होण्याची गरज आहे.पात्राच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवून सर्व वनस्पती मुळापासून काढण्याची गरज आहे.याबाबत पालिका प्रशासनाने दखल घेवून नदीच्या पात्राची स्वच्छता करून पात्राला गतवैभव प्राप्त करून
देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!